लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू असतानाच पेट्राेलिअम कंपन्यांनी पुन्हा विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सिलीडरसाठी तब्बल ८७१ रूपये मोजावे लागणार आहेत.
‘आधीचे थोडे...’ या उक्तीप्रमाणे अन्नधान्ये, कडधान्ये, तेले, भाज्या याचबरोबर इंधनाचे दरही वाढू लागले आहेत. घरगुती गॅसचे दरही भरमसाठ वाढू लागल्याने त्याचा वापर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. ग्रामीण जनतेचे तर त्याहून हाल होत असून, गावांमध्ये चुली पेटविण्यासाठी आता सरपणच उपलब्ध नाही.
गेल्या आठ महिन्यांत घरगुती गॅस महागल्याने जगायचे कसे, ही चिंता सामान्यांना सतावू लागली आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला योजना केवळ नावापुरती उरली आहे. या लोकांनाही महागडा गॅस वापरणे अशक्य झाले आहे.
सबसिडी बंद, दरवाढ सुरुच
n मे २०२०पासून गॅसवरील सबसिडी जवळपास बंदच झाली असल्याने सामान्य ग्राहकांना मिळणारा दिलासा संपला आहे.
n केंद्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. सुरूवातीला मोफत गॅस सिलिंडर जोडणीसह मिळाला. आता मात्र त्यांना गॅस भरण्याचे पैसे द्यावे लागतात.
n सबसिडीही बंद आणि दर भरमसाठ वाढू लागल्याने सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.
छाेटे सिलिंडरचे दर जैसे थे
सरकारने १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रूपयांनी वाढ केली आहे.
सध्या ५ किलोच्या छोट्या सिलिंडरचे दर मात्र ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे छोटे सिलिंडर वापरणाऱ्यांना हा दिलासा आहे.
सध्या छोट्या सिलिंडरचे दर अजूनही ४५० ते ४९५ एवढे ठेवण्यात आले आहेत.
डिसेंबर २०२०मध्ये घरगुती गॅस ६०५वरून ६५५ आणि पुन्हा ७०५ रूपये असा झाला. या महिन्यात १००ने वाढ झाली.
व्यावसायिक सिलिंडर तीन रुपयांनी स्वस्त
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी आता ८४६ ऐवजी ८७१ रूपये मोजावे लागणार आहेत.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ३ रूपयांची कपात झाल्याने १,५३६ ऐवजी आता १,५३३ रूपये द्यावे लागतील.
शहरात फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये राहावे लागत असल्याने आता चुली पेटविणेही अवघड झाले असून, सरपण कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न आहे.
- रेवती कांबळे, गृहिणी, रत्नागिरी
गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडू लागले आहेत. सामान्यांच्या आवाक्याबाहेर खर्च गेला आहे. परंतु, गावासारखी शहरात चूल पेटविण्याचीही सोय राहिलेली नाही.
- मंगला सावंत, कुवारबाव, रत्नागिरी