रत्नागिरी : धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगून तसेच गैरहजर राहिल्याबाबत वरिष्ठांना नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी ११ हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.प्रदीप प्रीतम केदार (५०) असे रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे नाव आहे. यातील तक्रारदार हे संगमेश्वर येथे पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर येथील धान्य गोदामाला दि. २२ मार्च राेजी जिल्हाधिकारी व संगमेश्वरचे तहसीलदार यांनी भेट दिली होती. त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते.
तसेच त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी तक्रारदार यांचे अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगितले. तसेच गैरहजर असल्याचे सांगून त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल न पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १५ हजारांची लाचेची मागणी केली हाेती. तडजोडीअंती ११ हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्यासह सहायक फौजदार चांदणे, हवालदार दीपक आंबेकर, संजय वाघाटे, विशाल नलावडे अंमलदार राजेश गावकर यांनी केली.