दापोली : कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षितता म्हणून तालुक्यातील सुकोंडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सुकोंडीचे सरपंच भरत हुमणे यांच्याकडून ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ संतोष मंडलिक, कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
बसवेश्वर जयंती साजरी
लांजा : येथील पंचायत समिती कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोनाच्या अनुषंगाने अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली. आमदार राजन साळवी यांच्याहस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभापती मानसी आंबेकर, दीपाली साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर आदी उपस्थित होते.
बागायतींचे नुकसान
साखरपा : आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने साखरपा परिसरातील आंबा, काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने लाखोंचे नुकसान झाले आहे. तलाठी, मंडल अधिकारी यांनी पंचनामा करून त्याचा अहवाल देवरुख तहसीलकडे पाठविला आहे.
१५८ रुग्णांचा मृत्यू
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात आतापर्यंत ३,६८५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सध्या ३३८ रुग्ण उपचार घेत असून, रत्नागिरीसह अन्य ठिकाणी यापैकी १७३ जणांवर उपचार सुरू आहेत. १६५ जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धोकादायक झाडे तोडली
चिपळूण : काही दिवसांवर पावसाळा आला असल्याने त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे शहराला काही प्रमाणात तडाखा बसल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून फांद्या तुटल्या आहेत. यापैकी धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे.
कोरोनामुक्ती प्रमाण वाढले
मंडणगड : एप्रिल महिन्यात मंडणगड तालुक्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागताच तालुक्याची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली. या यंत्रणेच्या प्रयत्नांमुळेच तालुक्यातील ७७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यू झालेल्यांचे प्रमाण केवळ दोन टक्के इतकेच आहे. २० मेपर्यंत तालुक्यात ४४६ रुग्ण सापडले. त्यापैकी ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बांधावर बियाणे
दापोली : येथील कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे सडवे, साखळोली, वाकवली, दापोली, कारुळ (ता. गुहागर) उधळे व कळंबणी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणांचे वाटप करण्यात आले. विस्तार शिक्षण विभागातर्फे कार्ली, घोसाळी, काकडी, भेंडी, चिबूड आदी बियाणांचे यावेळी वाटप झाले.
झाडीकडे दुर्लक्ष
जाकादेवी : निवळी जयगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे वाढली आहेत. मात्र ही झाडे तोडण्याकडे बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा या मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. दुतर्फा असलेली झाडे तोडण्यासंदर्भात निवळी, जयगड ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सॅनिटायझरचे वाटप
मंडणगड : संवेदना फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे तालुक्यातील घराडी येथील स्रेहज्योती अंध विद्यालय आणि मंडणगड पोलीस स्टेशनमध्ये मास्क, सॅनिटायझर आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. अंध विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीभा सेनगुप्ता आणि मंडणगड पोलीस ठाण्याचे बीट हवालदार इदाते यांच्याकडे या वस्तू देण्यात आल्या.
चिखलाचे साम्राज्य
लांजा : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकेड, आंजणारी, वेरळ घाटात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन वाकेड सुरक्षित रहावा यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या होत्या. मात्र या चक्रीवादळात या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे.