लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पवन तलाव मैदान येथे टाकलेला वादग्रस्त हजारो टन कचरा उचलण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेतला असून, नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्प जागेतच हा कचरा टाकला जात आहे. या कचऱ्याचे दोन प्रकारांत वर्गीकरण करून मगच विघटन केले जाणार आहे.
महापूर ओसरल्यानंतर हजारो टन कचरा उचलण्यात आला. मात्र, साथीचे आजार व रोगराई पसरू नये, या भीतीने हा कचरा उचलण्यात आला. त्यासाठी मुंबई, ठाणे व नवी मुंबईची अत्याधुनिक यंत्रणा लावण्यात आली. उचललेला कचरा शिवाजीनगर येथील डोंगर माथ्यावर असलेल्या नगरपरिषदेच्या कचरा प्रकल्प जागेत नेणे कठीण व खर्चिक होते. त्यामुळे संबंधित यंत्रणेने व प्रशासनाने बाजारपेठेपासून जवळच असलेल्या पवन तलाव मैदान येथे हा कचरा टाकला. त्या ठिकाणी सुमारे दहा हजार टन कचरा टाकला गेला व त्या व्यतिरिक्त अजूनही काही प्रमाणात कचरा बाकी आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला हा कचरा उचलून नेणे खर्चिक असल्याने तो शहरालगतच्या खासगी जागेत टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी शहरालगतच्या ग्रामीण भागात चौकशी सुरू होती. मात्र, ग्रामीण भागातूनही विरोध झाल्याने आणि शहरातील विविध प्रभागांत कचरा टाकण्यास स्थानिक नगरसेवकांनी विरोध केल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती.
त्यातच शिवसेनेचे नगरसेवक उमेश सकपाळ यांनी कचरा प्रकल्पाकडे कचऱ्याने भरलेली एकही गाडी जाऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने प्रशासन आणखी अडचणीत आले होते. अखेर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी याविषयी गंभीरपणे दखल घेत व अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने कचरा प्रकल्पाच्या जागेतच टाकण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दुपारपासून हे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी दहा डम्पर, सहा जेसीबी, दोन पोकलेन व अन्य यंत्रणा कामी लावण्यात आले आहे. साधारण संपूर्ण कचरा उचलण्यासाठी चारशे फेऱ्या अपेक्षित असल्याने तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.