एखाद्या घरात कोरोनाबाधित असला तर दुर्दैवाने शासकीय रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण आणि त्याच्याबरोबर त्या रुग्णांचे नातेवाईक हबकून जातात आणि मग त्याला वाचविण्यासाठी जीवाचे रान करून चांगल्यात चांगल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी धडपड करतात. महागडे असले तरीही आपल्या माणसाचा जीव त्यापेक्षाही लाखमोलाचा आहे, असा विचार करून पैशाची जमवाजमव करतात. काही खासगी रुग्णालये तर आधी पैसे ओता आणि मग रुग्णाला आत आणा, अशी असंवेदनशीलता दाखवतात. रुग्ण आत आल्यावर जणू काही बळीचा बकरा असल्याच्या थाटात सर्व तयारी सुरू करतात. अनावश्यक चाचण्या करून बिल वाढवायला सुरुवात होते. आधी केलेल्या चाचण्या असतील तरीही त्या परत परत करायला लावून निम्मा पैसा आधीच ओढला जात आहे. एवढे केल्यानंतर त्याला आपल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करून घ्यायचे आणि मग मनाला वाटेल तसे उपचाराच्या नावाखाली पैसे ओढायचे, ही पाॅलिसी सध्या काही खासगी कोरोना सेंटरची असल्याचे आता नातेवाईकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. रुग्णाचा प्राण त्याच्या नातेवाईकांना लाख माेलाचा वाटतो. पण पैशासाठी अशी दुकाने थाटल्यासारखी काेरोना सेंटर्स उघडून बसलेल्यांना मात्र, त्याचा प्राण कवडीमोलाचा वाटत असावा. म्हणूनच पैसे ओढून झाले आणि रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाली की मग त्याला शासकीय रुग्णालयात किंवा दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवायला सांगायचे. रुग्णाचे नातेवाईक त्याक्षणी अगतिक असतात. त्यामुळे आपल्या माणसाला वाचविण्यासाठी अनेक दिव्ये करायची त्यांची तयारी असते. मात्र, एवढे करूनही जेव्हा आपला माणूस रहात नाही, तेव्हा त्यांचा संयम तुटून पडतो. मात्र, बहुतांश नातेवाईक आपला माणूस गेला, मग आता पुढे जाऊन काय करायचे, असा विचार करून शांत बसतात. म्हणूनच अशा काही खासगी डाॅक्टरांचे फावते. त्यामुळेच पैशासाठी रुग्णांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार सध्या रत्नागिरीतही सुरू आहे.
खरेतर, डाॅक्टर म्हणजे रुग्णाकरिता प्राण वाचविणारा देवदूत असतो. पण सध्या कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि डाॅक्टर होण्यास पात्र नसलेल्या अशा खासगी डाॅक्टरांना कोरोना सेंटरची जबाबदारी देताना प्रशासनाने कुठलीच खातरजमा केली नसेल काय, त्यांना परवानग्या कशा दिल्या गेल्या, याविषयी आता नागरिकांकडूनच पोस्टमार्टेम करण्याची वेळ आली आहे.