चिपळूण : युतीचे शासन सत्तेवर आल्यावर आश्वारूढ पुतळ्याबाबत शहरप्रमुख देवळेकर यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. आवश्यक ते सहकार्य नगर परिषदेने करण्याचे ठरले. पण, त्यांनी साधी फाईलही हलवली नाही. देवळेकर हे सभागृहात एक बोलतात व सभागृहाबाहेर दुसरे बोलतात. शहरातील अनेक प्रकल्प रखडले, त्या प्रलंबित कामाच्या मागे पोटठेकेदार कोण? त्याचा भैरीच्या मंदिरात येऊन खुलासा करावा. आपले शहरप्रमुखपद वाचवण्यासाठी देवळेकर यांनी केलेली ही केविलवाणी धडपड आहे, असा आरोप नगराध्यक्षा सावित्री होमकळस व गटनेते राजेश कदम यांनी केला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख व नगर परिषदेचे गटनेते राजू देवळेकर यांनी सत्ताधारी पक्षावर धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यांना विकासकामावर बोलण्याचा किंवा आरोप करण्याचा अधिकार नाही, हे सांगण्यासाठी नगर परिषदेत सत्ताधारी पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गटनेते कदम पुढे म्हणाले, शहरातील रस्ते काँक्रीट करण्यासाठी निधी हवा होता. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, सरकार बदलले. म्हणून देवळेकर यांना चार वेळा प्रस्ताव दिले. परंतु, त्यांच्याकडून त्याचा पाठपुरावा झाला नाही. ते काही करू शकले नाहीत, हे त्यांचे बिंग पालकमंत्र्यांसमोर फुटेल व आपली खरडपट्टी होईल, या भीतीने पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला उपस्थित न राहता देवळेकर यांनी पळ काढला, अशी खिल्ली कदम यांनी उडवली. आता विदर्भातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने निधी वळवल्यामुळे निधी येणार नसल्याने काही कामे प्रलंबित आहेत. माजी आमदार कदम पालिकेत बसून काहीच झाले नाही, असे ते म्हणतात तेही चुकीचे आहे. जनतेच्या कामासाठी व विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाई पालिकेत येतात. ठेकेदारांची बिले काढा, हे सांगण्यासाठी येत नाहीत. पर्यटनासह अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामागे पोटठेकेदार कोण आहे, त्याचा भैरीच्या मंदिरात येऊन खुलासा करावा आणि मगच त्यांनी विकासकामांबद्दल बोलावे. आपण नगर परिषदेचे ट्रस्टी असल्याने सर्वांनीच विकासकामासाठी प्रयत्न करायला हवेत. आम्ही मंत्रालयात अनेकवेळा फेऱ्या मारल्या आहेत. आता तुम्ही मारा. ९ वर्षे झाली तरी देवळेकर यांना म्युनिसिपल अॅक्ट समजला नाही. त्यांच्यासाठी स्पेशल प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही खर्च करू, असेही कदम म्हणाले. पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावाबाबत ते म्हणाले, सभाशास्त्राला धरून देवळेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला नाही. दुखवटा, अभिनंदनाचा ठराव झाल्यानंतर इतिवृत्त मंजूर झाले. पहिले दोन विषय संपले. त्यानंतर देवळेकर यांना जाग आली. त्याच दरम्यान इनायत मुकादम यांचा विषय झाला होता. त्यामुळे हा अभिनंदनाचा ठराव झाला नाही. मुकादम यांनी आयत्यावेळच्या विषयात विषय काढला असता, तर त्यावर चर्चा झाली असती. नगराध्यक्षा बोलायला सर्वांना समान संधी देतात. दुसरा विषय सुरु झाल्यानंतर मुकादम पत्र वाचू लागले. नगराध्यक्षांनी सांगूनही ते जागेवर बसले नाहीत. उलट किंचाळून जोरजोरात बोलू लागले. त्यांनी अध्यक्षांचा अवमान केला म्हणून अध्यक्षांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. ते बाहेर गेले असते, तर त्याबाबत फेरविचार झाला असता. परंतु, ते सांगून ऐकत नव्हते. त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)देवळेकर यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी किती पैसे दिले ते जरा जाहीर करावेत. उलट खासदार अनंत गीते यांनी १० लाखाचा निधी शहराला दिला. आश्वारुढ पुतळ्याची जबाबदारी देऊनही त्यांनी अजून काही हालचाली केल्या नाहीत, असे कदम म्हणाले.आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम या दोघांच्या भांडणात शहराचा विकास खुंटला, हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही पक्षाच्या माध्यमातून बराचसा निधी आणला आहे, असे नगराध्यक्षा होमकळस यावेळी म्हणाल्या.
शहरप्रमुखपद वाचविण्यासाठी देवळेकरांची धडपड
By admin | Updated: November 5, 2015 00:10 IST