लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ऋतुमानातील बदलामुळे यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. मात्र, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत आहे. आतापर्यंत एक हजार ६६४ डझन आंबा लंडन, कतार, कॅनडासाठी थेट रत्नागिरीतून निर्यात करण्यात आला आहे. शिवाय १८०० डझन आंबा दिल्लीला पाठविण्यात आला आहे.
फळमाशीचे कारण देत आंबा निर्यातीवर युरोपीय देशाने निर्बंध घातले होते. उष्णजल प्रक्रियेमुळे आंब्यावर परिणाम होत असल्याने निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे परदेशातून आंब्याला चांगली मागणी होत आहे. आतापर्यंत कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात झाला आहे. दिल्लीसाठी एकूण १८०० डझन आंबा पाठविण्यात आला आहे. दिल्लीतून पुन्हा आंब्यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे.
कॅनडासाठी ४०८ व लंडनसाठी ४२० डझन आंब्याची नव्याने मागणी नोंदविण्यात आली असून, पणन विभागाच्या माध्यमातून सद्गुरू एंटरप्रायझेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. शेतकऱ्यांना जाग्यावरच आंब्याला ८५० रुपये डझन दर लाभत आहे. गुढीपाडवा जवळ असल्याने आंब्याला मागणी होत असून, दरही अद्याप स्थिर आहेत.
प्रसन्न पेठे, आनंद मराठे, रोहन देसाई, मंगेश पित्रे, दत्तात्रय तांबे, प्रीतेश लोकरे, सुभाष वाकडे, अशोक तोडणकर, उमेश हळदणकर या शेतकऱ्यांचा आंबा आतापर्यंत निर्यात झाला आहे. हापूस आंब्याचा मधुर स्वाद व अवीट गोडीने परदेशी नागरिकांनाही भुरळ घातली असल्याने आंब्याला मागणी वाढत आहे. वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविल्या जाणाऱ्या आंब्यापैकी ४० टक्के आंब्याची निर्यात आखाती व युरोपीय देशात सुरू असली, तरी रत्नागिरीतून थेट निर्यात सुरू असून, त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
पणन विभागातर्फे आंब्यावरील प्रक्रिया केंद्रांची जबाबदारी सद्गुरू एंटरप्रायझेसकडे तीन वर्षांपूर्वी सुपूर्द करण्यात आली आहे. बागायतदारांशी संपर्क साधून निवडक दर्जेदार आंबा पाठविण्यात येत असून, तत्पूर्वी आंब्याचे ग्रेडिंग, वॉशिंग, ब्रशिंग, ड्राईंग करून तो योग्य पद्धतीने पॅकिंग करून वातानुकूलित व्हॅनने मुंबईतील विमानतळावर पाठविण्यात येत आहे.
उत्पादन कमी असल्याने निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध होत नाही. मात्र, उपलब्ध होईल तसा आंबा निर्यात करण्यात येत आहे. लंडन, कॅनडासाठी २०० ते २२० ग्रॅम वजनाचा, तर कतारसाठी २३० ते २७० ग्रॅम वजनाच्या आंब्याची निवड करण्यात आली आहे.
कोट
अपेडा मान्यता प्रमाणपत्र सद्गुरू एंटरप्रायझेस निर्यातीसाठी तीन वर्षांपासून कार्यरत आहे. प्रक्रिया केंद्रामध्ये आंब्यावर आवश्यक त्या प्रक्रिया व त्यानंतर पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. कोकणचा आंबा विविध देशांतील ग्राहकांपर्यंत पोहोचविताना, शेतकऱ्यांना जागेवरच चांगला दर प्राप्त झाला आहे. लंडन, कॅनडाबरोबर दिल्लीतूनही मागणी वाढत आहे.
- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सद्गुरू एंटरप्रायझेस.