लाेकमत न्यूज नेटवर्क
हातखंबा : गणपती सुट्टीनंतर नववी, दहावी व बारावी वर्गांच्या पालकांची सभा बोलावून त्यांचे संमतीपत्र व हमीपत्र भरुन घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय हातखंबा येथील अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर आणि श्रीकांत ऊर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर काॅलेजच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. ही सभा हातखंबा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र तारवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेश म्हाप, विस्तार अधिकारी डॉ. अस्मिता मजगावकर, उपसरपंच सुनील डांगे, पोलीसपाटील शर्वरी सनगरे, माजी सरपंच विद्या बोंबले, हातखंबा विद्यालयाचे संपर्क निरीक्षक हुसेन पठाण, केंद्रप्रमुख प्रभाकर खानविलकर प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबाचे डॉ. साळवी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, माहेर संस्था निवळीचे अधीक्षक सुनील कांबळे, पालक संघाचे सदस्य आण्णा जठार, माता पालकच्या सहसचिव मिनल लांजेकर उपस्थित होते.
प्रभारी मुख्याध्यापिका मंदाकिनी मधाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी झरेवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ. अस्मिता मजगावकर यांना शिक्षण विस्तार अधिकारीपदी बढती दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन प्रा. अनिता पाटील यांनी केले, तर शिक्षक भीमसिंग गावित यांनी आभार मानले.