देवरुख : सध्या महाराष्ट्रात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी उपलब्ध लसीच्या साठ्याप्रमाणे प्रत्येक आरोग्य केंद्राला लस दिली जात आहे. हा साठा मर्यादित स्वरूपाचा असल्याने एकाचवेळी केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता होती. त्यामुळे संगमेश्वर तालुक्याचे सभापती जयसिंग माने यांनी पुढाकार घेत, सरपंच व ग्रामकृती दलाच्या सदस्यांची साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. पी. बी. अदाते यांच्यासमवेत बैठक घेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या गावांप्रमाणे लस वितरण करण्याचे ठरविण्यात आले.
तसेच साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात किरबेट, ओझरे, वांझोळे ही उपकेंद्र येतात. त्यामुळे ह्या परिसरातील ग्रामस्थांनाही लसीकरण मोहिमेत सहभागी होता आले पाहिजे, आरोग्य केंद्रापासून ही गावे दूर असल्याने त्यांना प्रवासाचा खर्च पडू नये, यासाठी त्या-त्या उपकेंद्रात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत किरबेट, भडकंबा ह्या गावांसाठी लसीकरण मोहीम पार पाडली आहे. बुधवारी वांझोळे उपकेंद्र येथे १०० डोस उपलब्ध करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असणाऱ्या गावांना गावाप्रमाणे लस देण्यात येणार आहे. जेणेकरून आरोग्य केंद्राच्या ठिकाणी गर्दी होऊ नये. लसीकरण मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याने प्रत्येक गावातील ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे. पुढील काही दिवसात मुबलक लस उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सभापती जयसिंग माने यांनी सांगितले.