लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही वाहन चालक वेगाने गाडी चालवतात. यातून घडलेल्या अपघातांमध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
लाॅकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण घटले होते. सध्या जिल्ह्यातील अपघातांची संख्या खूप कमी आहे. याला प्रमुख कारण लाॅकडाऊन आहे.
२०१८ मध्ये १३० अपघात झाले, २०० जखमी, मृत्यू २७, तर २०१९ मध्ये १११ अपघात १४४ जखमी, तर १६ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. २०२० मध्ये ६१ अपघात, जखमी ६२, तर २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये ३५ अपघात, ३३ जण जखमी व १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
काेराेनानंतर जशी परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. तसे लाेकांनी गाडीच्या वेगाचे नियंत्रण वाढवायला सुरुवात केले आहे. वारंवार पोलीस प्रशासनाकडून सांगूनही लोक ऐकत नाहीत व अपघात होतात.
लाॅकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...
- मुंबई-गोवा महामार्गावर किंवा ग्रामीण भागातील मार्गावर अपघात होतच असतात. रस्ते अपघातात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते.
- गेल्या वर्षी पहिल्या लाॅकडाऊनमध्ये अपघातांची संख्या खूपच तुरळक होती, परंतु जसेजसे पूर्वपदावर यायला सुरुवात झाली, तसतशी अपघातांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या ठिकाणी वाहने हळू चालवा
- ग्रामीण भागात मार्ग चांगला असल्यामुळे वाहने अतिशय जोरात चालविले जाते. काही ठिकाणी वळणांमुळे वाहने समोर आल्यामुळे दिसत नाहीत. वळणावर वाहनावरील ताबा सुटण्याचा धोका अधिक असतो.
- रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गाव, वेरळ, वाकेड, आंजणारी घाट, पाली बाजारपेठ, लांजा बाजारपेठ या ठिकाणी वाहने हळूच चालवावी.
पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धाेका
चालत जाणाऱ्या व्यक्तीला धोका असतो, पण जिल्ह्यात आतापर्यंत पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी राहिले आहे. चालत जाणाऱ्या लोकांनीही काळजीपूर्वक वाहनांची गती बघून व दिशा बघूनच मार्ग बदलावा. चालत जाताना मोबाइलचा वापर टाळावा, जेणेकरून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे लक्ष राहिल.
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
अपघात बहुतांशी वाहने वेगाने चालविण्यामुळे होतात. काही वेळा डोळ्यावर झोप आलेली असतानाही दूर पल्ल्याचा प्रवास केला जातो. तरुणाई अनेक धोक्यांना कवटाळत वाहन चालवत असते. त्यामुळे जीवघेणे अपघात घडतात, त्यात तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
वेळ माैल्यवान, पण जीवन अमूल्य
कोणतेही काम कितीही महत्त्वाचे असेल, तरी वेळेपूर्वी निघाल्यास हळुवार पोहोचता येते. कुठेही जाताना वाहनाचा वेग वाढवून जाऊ नये. ‘लवकर निघा, सुरक्षित जावा’ हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवा. गाडी चालविताना मनात कोणतेही विचार आणू नयेच, गाडी चालविताना एकाग्रता ठेवावी.
- प्रतीक काणेकर, राजापूर.
काही नागरिकांना अतिशय वेगाने वाहन चालवायची सवय असते. जेवढा वेगाने वाहन तुम्ही चालवाल, तेवढा धोका अपघातास असतो. त्यामुळे कुठेही जाताना वाहन हळूच चालवा. कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा गेले, तर चालेल, पण कधीच न जाणे योग्य ठरणार नाही.
- प्रथमेश भागवत, रत्नागिरी.