रत्नागिरी : लांजा तालुक्यातील शिपोशी गावाचे मूळ रहिवासी असलेले आणि सध्या भारतीय सेनेत जम्मू येथे कार्यरत असलेले नायब सुभेदार विवेक भास्कर जाधव यांचा सेवा बजावत असताना मृत्यू झाला. विवेक जाधव यांनी आत्तापर्यंत भारतीय आर्मीत लखनऊ, कारगील, आसाम, पुणे, कांगो आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. अलिकडेच ते जम्मू येथील उधमपूर येथे कार्यरत होते. जम्मू येथे सेवा बजावत असताना जाधव हे अचानक बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना भारतीय सेनेच्या विशेष हवाई रुग्णवाहिकेने दिल्ली येथील आर. आर. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर उपचार चालू असतानाच २ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. विवेक जाधव यांचेवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ सेना अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. अत्यंत मनमिळावू असलेले जाधव यांचे शिक्षण हे शिपोशी येथे झाले होते. दरम्यान जाधव यांच्या मृत्यूने शिपोशीसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन लहान मुले असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
नायब सुभेदार जाधव यांचा मृत्यू
By admin | Updated: December 9, 2015 01:14 IST