जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती हाेताच आमदार भास्कर जाधव यांचे सारे कुटुंबीय एकत्र आले हाेते. या वेळी त्यांच्या काैटुंबिक एकीचे दर्शनच साऱ्यांना झाले. (छाया : तन्मय दाते)
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड हाेणार हे निश्चितच हाेते. त्यामुळे त्यांच्या निवडीचा आनंदाेत्सव साजरा करण्यासाठी त्यांचे सारे कुटुंब जिल्हा परिषदेत उपस्थित हाेते. या निवडीच्या निमित्ताने आमदार जाधव यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राखलेल्या एकीचे दर्शन झाल्याची चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेत सुरू होती.
विक्रांत जाधव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या निवडीच्या वेळी आमदार जाधव यांची सर्वच मुले उपस्थित होती. शिवाय त्यांच्या सुनांच्या माहेरच्या मंडळींनीही आवर्जून उपस्थिती लावली होती. यामध्ये सोलापूर येथून विक्रांत जाधव यांचे सासू-सासरे गोदकर कुटुंबीय आणि मोठे चिरंजीव समीर जाधव यांच्या सासरची मंडळीही कोल्हापूरहून रत्नागिरीत आले होते.
आमदार जाधव यांची दुसरी कन्या कीर्ती पाटील आणि त्यांचे कुटुंबीय तर दुसरी कन्या कांचन आणि त्यांचा परिवारही या आनंदी सोहळ्याला उपस्थित होते. आमदार जाधव यांचे भाऊ, बहिणी आणि त्यांची मुले व कुटुंबीय अशा संपूर्ण कुटुंबाने जिल्हा परिषद अध्यक्षांचे दालन भरून गेले होते. त्यामुळे आमदार जाधव यांच्या कुटुंबीयांच्या एकीचे दर्शन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.