शिवाजी गोरेदापाेली : काेकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले ‘मिनी महाबळेश्वर’ अर्थात दापाेली तालुका आज पर्यटकांच्या खास आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. ब्रिटिश काळात ‘गाेऱ्या सायबां’ना या थंड हवेच्या ठिकाणाची भुरळ पडली हाेती. नररत्नांची खाण म्हणून ओळख असलेल्या दापाेली तालुक्याला पर्यटनामुळे एक वेगळीच ओळख मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दापोली तालुक्याने पा. वा. काणे, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न दिले आहेत. त्याचबराेबर सानेगुरुजी, लोकमान्य टिळक, कवी केशवसुत या महापुरुषांच्या नावाने हा तालुका ओळखला जातो. अलीकडे ‘पर्यटन तालुका’ म्हणून दापाेली तालुका ओळखला जाऊ लागला आहे. तालुक्यातील मुरूड, कर्दे, लाडघर, कोळथरे, दाभोळ, हर्णै, पाळंदे, आंजर्ले, केळशी हे स्वच्छ समुद्रकिनारे जगाच्या पर्यटन नकाशावर कोरले गेले आहेत. या समुद्रकिनाऱ्याची जागतिक पर्यटन स्थळाच्या यादीत नोंद झाली आहे. त्यामुळे देश- विदेशातील पर्यटकांची पावले आपसूकच दापाेलीकडे वळतात.
ऐतिहासिक पर्यटनस्थळेछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दाभोळ चंडिका देवी मंदिर, दाभोळ बंदर, हर्णै येथील सुवर्णदुर्ग हा पाण्यातील किल्ला, तसेच केळशी येथील महालक्ष्मी मंदिर. याकुबाबा दर्गा ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत.
प्राचीन वास्तूदाभोळ अंडा मजीद, उंच टेकडीवरील बालापीर, दाभोळ पांडवकालीन चंडिका देवी मंदिर, पांडवकालीव केशवराज मंदिर-आसूद, पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिर-मुरूड, पंचमुखी हनुमान मंदिर-दापोली, व्याघ्रेश्वर मंदिर-आसूद, कड्यावरचा गणपती-आंजर्ले, प्राचीन ऐतिहासिक मंदिरे दापोलीच्या पर्यटनात भर घालत आहेत.
बंदरांचे आकर्षणपारंपरिक दाभोळ, बुरोंडी, हर्णै ही मासेमारी बंदरे आर्थिक उलाढालीचे मुख्य केंद्रबिंदू आहे. याठिकाणी हाेणारा माशांचा लिलाव पाहण्यासाठी खास पर्यटक बंदराला भेट देतात.
ब्रिटिशांचा हाेता ‘कॅम्प’कधी काळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी दापोलीची निवड केली होती. समुद्रामार्गे जाणे-येणे सोयीचे होण्यासाठी हर्णै बंदराचा वापर केला जात होता. बंदरातून बग्गीने येऊन थंड हवेचे ठिकाण दापोलीत ब्रिटिश अधिकारी ठाण मांडत होते. महाबळेश्वर नंतर दापोली थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांना भावली होती. या ठिकाणी त्यांच्या ‘कॅम्प’ होता. ब्रिटिश सोडून गेले; परंतु दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ ही ओळख देऊन गेले.
कृषी पर्यटनडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, शेतकऱ्याप्रमाणेच पर्यटकांचेही आकर्षण आहे. कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्राला भेट देऊन पर्यटक कृषी पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
पांडवकालीन लेणीपांडवकालीन पन्हाळेकाझी येथील लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक भेटी देत असतात. पन्हाळेकाझी येथील पन्हाळेदुर्ग किल्ल्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या लेण्यांसमोर वाहणारी कोळजाई नदी पर्यटकांना आकर्षित करते.
एलियनसदृश कातळशिल्पउंबर्ले गावात अलीकडेच ‘गाढव खडक’ परिसरात आढळलेल्या एलियनसदृश कातळशिल्पामुळे दापोली तालुक्याच्या पर्यटनात भर पडली आहे. हजारो पर्यटक २० हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पाला भेट देत आहेत.
फेरीबाेटीमुळे पर्यटनाला चालनासुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीच्या माध्यमातून दाभोळ, बाणकोट खाडीवर फेरीबोट सेवा सुरू झाल्याने रायगड-रत्नागिरी दोन जिल्ह्यांतील पर्यटनाला चांगली गती मिळाली आहे. पुणे, मुंबई येथून सागरी महामार्गाने येणारा पर्यटक खाडीवरील फेरीबोट सेवेमुळे सहज कोकणात येत आहे.