शिवाजी गोरे - दापोली एस. टी. महामंडळाचा डोलारा ज्यांच्यावर आहे, त्याच चालक - वाहकांना महामंडळाकडून अपुऱ्या सुविधा पुरवल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १९ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन चालक - वाहकाच्या विश्रांतीगृहात सुधारणा करण्याची गरज असताना दापोली आगारप्रमुखानी दुखणे दूर करण्याएवेजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीकडे माहिती का दिलीत, असे म्हणत त्यांनाच झापण्यास सुरुवात केली. चालकांवर दोषारोप ठेवून चुकीचा उपचार सुरु केल्याने ‘जखम बोटाला अन् मलम नाकाला’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.दापोली आगारातील चालक, वाहक विश्रांतीगृह की गैरसोईचे आगार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये १९ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. जिल्ह्यातील सर्व आगारांची हीच अवस्था आहे. मात्र, उघडपणे बोलल्यास आम्हाला टार्गेट करुन त्रास देण्यात येत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक चालक - वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दापोली आगाराच्या विश्रांतीगृहातील शौचालय व स्नानगृहाची पाहणी केली असता कोणत्याही नळाला पाणी नव्हते. त्याचप्रमाणे विश्रांतीगृहातही पाणी नव्हते.विश्रांतीगृहात शाभेचे बाहुले बनवून एक हंडा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये एकही थेंब पाणी नव्हते. त्या हंड्याचे व शौचालयातील पाण्याच्या नळाचे फोटो व शूटिंगही करण्यात आले होते. प्रत्यक्ष पाहणीत आढळून आलेली वस्तुस्थिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली.आगार प्रमुखानी शासनाच्या परिपत्रकांचे पालन करुन कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावात, त्यांचे आरोग्य व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील, याकडे लक्ष द्यावे. याकरिता ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. काही चालक - वाहकांच्या प्रतिक्रियासुद्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांची नावे वृत्तपत्रांत येताच त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारुन व काही लोकांना खिंडीत पकडून खोटे जबाब लिहून घेतल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले आहे.महामंडळाच्या धोरणावर किंवा कृतीवर वृत्तपत्रातून किंवा इतर प्रकारे सार्वजनिकरित्या टीका करणे, महामंडळाच्या कामकाजाबाबत किंवा प्रशासनाबाबत गाऱ्हाणी मांडण्यासाठी वृत्तपत्राकडे धाव घेणे, हा गुन्हा आहे, असा दोषारोप चालकांवर ठेवण्यात आला आहे. दि. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी आगार व्यवस्थापकांच्या अहवालावरुन असे आढळून आले आहे की, तुम्ही दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या वार्ताहरांना अनधिकृ तपणे आगारात बोलावून त्यांना चालक, वाहक विश्रांती गृहाबाबत आक्षेपार्ह व खोडसाळ माहिती पुरविली. त्यामुळे एस. टी. महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे. वृत्तपत्रात बातमी देण्याला तुम्ही जबाबदार आहात, अशा प्रकारे तुम्ही खात्याची शिस्त आणि अपील कार्यपद्धतीचे अनुसूची अ कलम ४१, १०, २२ प्रमाणे गुन्हा केला आहे. अशा स्वरुपाचे एका चालकावर आरोपपत्र ठेवून विभागीय वाहतूक अधीक्षकांनी चोराला पाठीशी घालून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार सुरु केला आहे. संबंधिताला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच सुधारणा करण्याऐवजी जे लोक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांचे जबाब नोंदवून घेतले. हा अहवाल विभागीय वाहतूक अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्यात आला. राजेश मोरे, रुपेश येलवे, आर. एल. पाटील, अमोल भोसले, पी. व्ही. ठोंबरे यांचा जबाब घेण्यात आला आहे. दापोली एस. टी. महामंडळाच्या कारभाराबाबत प्रवाशांमध्ये तीव्र संताप.वस्तुस्थिती मांडल्याबद्दल नसत्या कारवाईला तोंड देण्याचे फर्मान. कारवाईचा बडगा उगारणाऱ्यांची वेगळीच भूमिका.दापोली आगाराच्या कारभाराबाबत तक्रारींचा पाढा. संबंधिताना न्यायाची अपेक्षा.
दापोली आगारप्रमुखांचा अजब कारभार
By admin | Updated: April 18, 2015 00:05 IST