दरम्यान, तालुक्यातील दुर्गम भागातील गावे अजूनही अंधारातच चाचपडत असल्याने महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तौउते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील घरांना बसला आहे. घरांसह गोठ्यांचीही पडझड झाली. ठिकठिकाणी महावितरणचे विद्युत खांब कोसळून नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचनाम्याच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने पंचनाम्याच्या कामांनी वेग घेतला आहे.
महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार ४४८ घरांची पडझड झाली. यामध्ये ३२ गोठ्यांचाही समावेश आहे. चक्रीवादळात बोरज येथे तुटलेल्या वीजवाहिनीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून, चार कच्च्या घरांचेही नुकसान झाले. तसेच दोन टपऱ्यांचीही मोडतोड झाली आहे. नुकसानीचा आकडा वाढणार अजूनही पंचनाम्याचे काम सुरूच असून नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळात महावितरणलाही मोठा तडाखा बसला आहे. ग्रामीण भागात ठिकठिकाणी कोसळलेल्या विद्युत खांबांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे.