रत्नागिरी : कांद्याचे दर वधारले आहेत. सध्या ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. भविष्यात दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिसळीतील कांदा गायब झाला आहे, तर टपऱ्यांवरील कांदाभजीचा पत्ताच कट झाला आहे.कांदा वधारल्यामुळे उपाहारगृह व टपरी व्यावसायिकांना कांदा सढळ हस्ते देणे परवडत नाही. कांदा भविष्यात वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी कांद्याने १०० रूपये किलोपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ते खाली आले होते. सहा ते सात रूपये दराने कांद्याची विक्री सुरू होती. परंतु पावसाअभावी कांद्याचे दर वधारले तसेच ते आणखी वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी मिसळीतून कांदा देणे बंद केले आहे. काही उपाहारगृहांतून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो. परंतु कांदाभजी मात्र बंद करण्यात आली आहे. कांदा ७ ते ८ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. त्यावेळी कांदाभजी १५ रूपयांना ५ नग देण्यात येत होते. मात्र, ३० ते ३५ रूपये दर असल्याने दर वाढविला तर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा नसल्यामुळे कांदाभजी काढणे बंद करण्यात आली आहे.मूग किंवा वाटाण्याच्या गरमागरम रशात सढळ हस्ते कांदा, फरसाण, कोथिंबीर, कांदेपोहे, शेव घातली जाते. वरून पुन्हा एकदा कडकडीत रस्सा ओतला जातो. कांद्याचा दर वाढल्याने सढळ हस्ते कांदा देणे परवडत नाही. त्यामुळे बहुतांश उपाहारगृहातून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो, तर टपरी व्यावसायिकांनी तो देणेच बंद केले आहे. शिवाय पुन्हा कुठल्या ग्राहकांनी कांदा मागविला तर त्यांना चक्क नकार दिला जातो. बहुतांश हॉटेल्समध्ये कांद्याऐवजी चिरलेला कोबी दिला जातो.टपरीवर येणारा ग्राहक सर्वसाधारण गटातील असतो. त्यामुळे कांदाभजीचे दर वाढविणे परवडणारे नाही. त्यामुळे कांदाभजी तयार करणे बंद करण्यात आले आहे. शिवाय पावसाळ्यात घरोघरी भजीचा सुगंध दरवळतो. मात्र, यावर्षी महागाईमुळे कांद्याऐवजी चक्क कोबीची भजी करून पानात वाढून घेतली जात आहे.यावर्षी कांदा, बटाट्याचे दर वाढले आहेत. अजून दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साठा केलेला कांदा जपून वापरण्यात येत आहे. कांदाभजी प्लेटमध्ये १५ रूपयास ५ नग देणे परवडत नाही. प्लेटचे दर वाढविले तर मात्र ते ग्राहकांस परवडणारे नाहीत. त्यामुळे एकूण अंदाज घेत कांदाभजीची विक्री बंद करण्यात आली आहे. मिसळीत नावाला कांदा घालण्यात येत आहे. बटाटाभजी, बटाटावडा, मिक्स भजी, मिरची भजी सध्या विक्रीस उपलब्ध आहेत.- के.एस. कांबळे, व्यावसायिक, रत्नागिरी (प्रतिनिधी)
मिसळीतून कांदा गायब, कांदाभजीचा पत्ता कट
By admin | Updated: July 9, 2014 23:45 IST