रत्नागिरी : राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन अधिक कडक करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे कुठल्या कुठल्या जिल्ह्यांवर अधिक निर्बंध लावले जाणार आणि कुठले नियम शिथिल करण्यात येणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
मान्सूनची प्रतीक्षा
चिपळूण : उष्णता पराकोटीला पोहोचली असल्याने नागरिकांना आता उकाडा सहन करणे अवघड झाले आहे. यावर्षी मान्सून केरळ राज्यात ३१ मे रोजी धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, आता पुन्हा मान्सूनचे आगमन लांबण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नागरिक मान्सून कधी येणार, याची प्रतीक्षा करीत आहेत.
लसीकरण मोहीम
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी ग्रामपंचायतीने विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली होती. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. या लसीकरण मोहिमेत गावातील ११० ग्रामस्थांनी लस घेतली. ही मोहीम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
रक्तदान शिबिर
दापोली : केंद्र सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त दापोली तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने दापोली येथील राधाकृष्ण मंदिरात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ५० दात्यांनी रक्तदान केले.
कोविड योद्धयांचा सन्मान
गुहागर : लसीकरणासाठी जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तिंना विनामूल्य रिक्षा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गुहागर शहरातील स्वयंप्रकाश गोयथळे मंडळातर्फे पराग भोसले यांचा सत्कार करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींसाठी जीवन शिक्षण शाळा येथे ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली.