दापोली : पालघर येथून दापोली येथील बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्ये बैठकीनिमित्त येत असलेले कृषी सहायक नाना लोटण ठाकरे (५०) यांचा दापोली-मंडणगड रोडवरील सोंडेघरनजीक असलेल्या जोशी बंगल्यासमोर झालेल्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.नाना लोटण ठाकरे (धुळे) हे ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत होते. आज दि. ८ रोजी ते येथील कोकण कृषी विद्यापीठामध्ये एका बैठकीनिमित्त यायला निघाले असता दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची वॅगनआर गाडी (एमएच ०६ बीई ३३८६) दापोली - मंडणगड मार्गावरील सोंडेघरनजीक आली असता जोशी बंगल्याजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या बाजूच्या झाडावर ही गाडी जोरदार आदळली. यामध्ये नाना ठाकरे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, भास्कर बेलोसे यांनी याबाबतची खबर दापोली पोलिसांना देताच दापोलीचे हेडकॉन्स्टेबल मारळकर आणि रहाटे घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला. पिसई येथील आरोग्य केंद्रात ठाकरे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, या घटनेची दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. (वार्ताहर)
कृषी सहाय्यकाचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST