रत्नागिरी : पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रा. लि. चा मालक शशिकांत राणे (वय ४०, रा. मुंबई) याच्याविरोधात रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. येथील व्यवसायिक दिनार प्रभाकर भिंगार्डे यांनी हा गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, शशिकांत राणे यांच्या सॅफरॉन कंपनीमार्फत पैसे दामदुप्पट, तिप्पट करण्याचे आमिष दाखवून अनेकजणांकडून पैसे जमा केले होते. दिनार भिंगार्डे यांनीही १९ लाख ९८ हजार ४५० रुपये वेगवेगळ्या योजनांत गुंतविले होते. मुदत संपल्यानतंरही राणे यांनी पैसे परत दिले नाहीत. याबाबत भिंगार्डे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राणे यांनी दिलेला धनादेशही वटला नाही. परिणामी भिंगार्डे यांनी आज रत्नागिरी पोलीसांत गुन्हा नोंद फसवणुकीचा केला. राणे यांच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा मुलुंड पोलिसांत दाखल झालेला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुलुंड पोलिसांनी राणे यांना अटक केली आहे. तेथे त्यांना २१ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, राणे यांचा ताबा मिळविण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचे एक पथक उद्या मुंबईला जाणार आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश निसर करीत आहेत. (प्रतिनिधी)