राजापूर : भाऊ कसाही असला तरी बहिणीचे आपल्या भावावर अतोनात प्रेम असते. आपल्या भावासाठी जिवावर उदार होऊन ही बहीण त्याच्यासाठी कोसावरुन धावत येते व त्याला मदत करते. अशीच एक घटना राजापूर तालुक्यातील हरळ गावात घडली आहे. जन्मापासूनच मूकबधीर असणारा प्रशांत मधुकर वाफीलकर हा ७ वर्षांचा मुलगा घराच्या आसपास खेळता खेळता विहिरीत पडला. त्याची चाहुल लागताच त्याची नववीत शिकणारी बहीण प्रियाने आपल्या जिवाची तमा न बाळगता थेट विहिरीत उडी घेत त्याला बाहेर काढले. या तिच्या धाडसी कामगिरीची वाहवा होत आहे.राजापूर तालुक्यातील हरळ येथील ग्रामस्थ मधुकर रामचंद्र वाफीलकर यांचा छोटा व जन्मताच मूकबधीर असणारा ७ वर्षांचा मुलगा प्रशांत हा घराच्या बाहेर खेळत होता. त्यावेळी प्रशांतची आई घरात काम करत होती तर त्याची बहीण प्रिया ही शाळेत जाण्याची तयारी करीत होती. खेळता खेळता प्रशांत घराशेजारी असणाऱ्या विहिरीत पडला. त्यावेळी शाळेत जाण्याची तयारी करत असणाऱ्या प्रियाला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यामुळे बाहेर धावत येऊन तिने विहिरीत डोकावले, तर तिला प्रशांत विहिरीत पडला असल्याचे दिसले.प्रशांत विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहून प्रिया घाबरुन गेली. आता काय करावे, हे तिला कळत नव्हते. मात्र, तिने क्षणाचाही विलंब न लावता थेट विहिरीत उडी घेतली व बुडणाऱ्या प्रशांतला आपल्या कवेत घेतले. त्याला घेऊन विहिरीबाहेर येणे तिला शक्य नव्हते. अखेर तिने प्रशांतला घेऊन विहिरीचा काठ गाठला व आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने घरात काम करत असलेली तिची आई बाहेर आली. तिने या दोघांना विहिरीच्या काठावर पाहिले व ग्रामस्थांना आरडाओरडा करुन बोलावले. नंतर ग्रामस्थांनी येऊन प्रशांत व प्रियाला विहिरीतून बाहेर काढले.प्रियाने दाखवलेल्या या धाडसाची बातमी हा हा म्हणता सर्वत्र पसरली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपल्या मूकबधीर भावाला वाचवणाऱ्या प्रियाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सरपंच मंगेश पांचाळ यांनी घरी जाऊन प्रियाचे अभिनंदन केले आहे. प्रत्येकाने मदत करणे, हे व्रत म्हणून स्वीकारावे, असे प्रत्येकजण म्हणतो. मात्र, बालशौर्याच्या या सत्य घटनेमुळे संवेदना माणूसकी जपतात, हे अशा घटनांतून स्पष्ट होते. स्वातंत्र्यदिनी त्यांचे कौतुक होणार आहे. (प्रतिनिधी)स्वातंत्र्यदिनी सत्कारआता १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत तिचा ग्रामपंचायतीच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शासनाने तिला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी तालुकावासीयांमधून करण्यात येत आहे.
वेड्या बहिणीची वेडी ही माया!
By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST