- उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने खासगी गाड्या खरेदी करण्याचा निर्णय रद्द करून त्या ठिकाणी महामंडळाने स्वत:च्या लालपरी गाड्या घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी़ कामगार संघटनेच्या रत्नागिरी विभागातर्फे करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.
खासगी गाड्यांमुळे होणारे तोटे अधिक आहेत शिवाय मिळणाऱ्या उत्पन्नाला एस. टी. महामंडळ मुकणार आहे. खासगी गाड्यांच्या देखभालीसाठी महामंडळाच्या जागा देण्यात येणार असल्याने या गाड्यांना राज्यातील सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. महामंडळाने स्वमालकीच्या लालपरी गाड्या खरेदी करण्याबरोबर कामगारांची प्रलंबित देणी पूर्ण करून वर्धापनदिनी या कोविड योध्दयांचा सन्मान करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत परिवहनमंत्री तथा पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून एस. टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या शिष्टमंडळाला लवकरच परिवहन मंत्री व पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करणार असून एस. टी़ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या सोडविण्याबरोबरच महामंडळात खासगी गाड्या घेण्यात येऊ नयेत, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी विभागाचे अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव संदेश सावंत, चिपळूण आगाराचे सचिव रवी लवेकर, खेड आगाराचे सचिव बाळाराम सोंडकर, दापोली आगाराचे अध्यक्ष अनंत दयाळकर, विभागीय सदस्य मिलिंद बाईत, महेश गुजर, सचिन राजेशिर्के उपस्थित होते.
चौकट
बेस्ट सेवेतून महाराष्ट्रातील उर्वरित विभाग वगळण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडून संघटनेला दिलेला ‘शब्द’ पूर्ण केल्याबद्दल शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.