कोकणातील समुद्रकिनारे, डोंगर, नद्या तसेच हिरवाई यांचे आकर्षण पर्यटकांना अधिक असते. त्यामुळे त्याच्या आकर्षणाने सुट्यांच्या कालावधीत पर्यटक कोकणात येत असतात. अगदी एक दोन दिवसांच्या कालावधीतही ताण घालवायला येणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे. त्यामुळे परीक्षा मार्च - एप्रिलच्यादरम्यान संपल्या की, मग पर्यटकांना वेध लागतात ते कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचे आणि इथल्या निसर्गसौंदर्याचे. काही वेळा तर पावसाळी पर्यटनासाठीही येणारे पर्यटक आता वाढू लागले आहेत. पावसाळ्यात कोकणचे हिरवेगार सौंदर्य पर्यटकांना अधिक भावते. म्हणूनच जून - जुलैनंतर पाऊस कमी झाला की, ऑगस्ट महिन्यात कोकणातील अवखळ धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येतात.
कोकणच्या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. इतर विशेषत: समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने एक दोन दिवसांच्या सुटीसाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. मात्र, २०२० साल सुरू झाले ते कोरोनासाेबतच. त्यामुळे गेल्यावर्षी ऐन उन्हाळी पर्यटनाचा हंगाम असूनही पर्यटकांना घरी बसावे लागले. लाॅकडाऊनचा कालावधी वाढला. त्यामुळे अगदी सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत पर्यटक घरातच होते. डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने तब्बल दहा महिने घरातच अडकून पडलेले पर्यटक जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडले.
जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांत पर्यटनाचा आनंद मिळाला. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने आता लवकरच कोरोना नष्ट होणार, असे वाटत होते. त्यामुळे कोरोना संपल्यानंतर उन्हाळी हंगामात अनेकांनी पर्यटनाचे नियोजनही केले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या भरमसाठ वाढत असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संसर्ग थोपविण्याच्या दृष्टीने शासनाने ‘ब्रेक दि चेन’ मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन सुरू झाले आहे.
सध्या कोरोनास्थिती चिंताजनक असल्याने ती बदलण्यास अजून काही कालावधी जाणार आहे. सध्या शासनाने ९ वीपर्यंत तसेच अकरावीचीही परीक्षा रद्द केली आहे. दहावी - बारावीच्याही परीक्षा लांबणीवर गेल्या असल्या तरीही त्या या महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन अथवा ऑफलाईन परीक्षा झाल्या तरीही सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने शासनास नाईलाजाने मिनी लाॅकडाऊन सुरू करावा लागला आहे. वीकएंडला पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर झाल्याने या कालावधीत पर्यटकांना सुटीचा आनंद घेण्यासाठी येणे अवघड होणार आहे. त्यामुळे कोरोनास्थिती पाहता, यावर्षीही कोरोनाचे सावट पर्यटनावर राहणार असल्याचे वाटू लागले आहे.