मंडणगड : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. मात्र, मंडणगड तालुका त्याला अपवाद ठरला आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्येचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच या तालुक्यात गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह एकही रुग्ण सापडलेला नाही.
हळद लागवडीद्वारे रोजगारनिर्मिती
देवरूख : संगमेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात हळद लागवडीद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार, स्वयंरोजगाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावर अनेकांनी भर दिला आहे. कोकण कृषी विद्यापीठाने हळकुंडापासून तयार केलेली नवीन रोपे बहुतांशी ग्रामस्थांनी लागवडीसाठी वापरली आहेत.
जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा
रत्नागिरी : वादळाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने दिवसेंदिवस नुकसानीचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यात वादळामुळे पाणीटंचाईचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, लागोपाठ दोन वादळे आल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाईवर झाल्याचे दिसून येत आहे. यंदा टँकरही कमी धावत आहेत.
निर्जंतुकीकरणाची मोहीम नाही
रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात निर्जंतुकीकरणाची मोहीम माेठ्या प्रमाणात राबविण्यात आली होती. नगर परिषदा, ग्रामपंचायतींनी परिसरातील कानाकोपऱ्यांत कोरोनाचा जंतू राहू नये, यासाठी गल्लीगल्लींत निर्जंतुकीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली होती. मात्र, आता याकडे दुर्लक्ष होत असल्याने निर्जंतुकीकरणाची मोहीम अजिबात राबविली जात नाही.
प्रभावी अंमलबजावणी
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी ग्रामपंचायत क्षेत्रात माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून ग्रामस्थांनी कोरोनामुक्तीवर भर द्यावा, असे आवाहन उपसरपंच मिथुन लिंगायत यांनी केले आहे.
यंदा हापूस अडचणीत
पाली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा तिठ्यावर भरणाऱ्या मिनी हापूस बाजाराला सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन, संचारबंदीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. सुमारे १०० ग्रामस्थांचा रोजगार बुडाला असून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.
रोपे खरेदीसाठी धावपळ
राजापूर : संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांनी विविध रोपांच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, पेरू, चिकू, मसाल्यांच्या रोपांची विक्री सुरू झाली आहे. ही रोपे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
आंबा, मासळीचा हंगाम वाया
रत्नागिरी : कोरोनाने सर्वच उद्योग-व्यवसायांवर पाणी फिरले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. तर, काही चालू आहेत. पण, ग्राहक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा तसेच मासळीचा यंदाचा व्यवसाय वाया गेल्याने मच्छीमार, बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.