लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त समजला जातो. हिंदू नववर्षास प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. मंगळवार, दि.१३ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्यानिमित्ताने आवर्जून खरेदी करण्यात येत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. मात्र कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने बाजारपेठा शांत आहेत.
पाडव्याच्या मुहूर्तावर सोने- चांदीचे अलंकार, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, तयार घरे, जमिनींची खरेदी केली जाते. किंबहुना आधी खरेदी केलेल्या वस्तू पाडव्याच्या दिवशी घरी आणल्या जातात. मात्र कोरोनामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यवसाय बंद आहेत. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील उलाढाल ठप्प होणार आहे.
पाडव्यानिमित्त फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भेटवस्तू बाबतच्या सुविधा विक्रेत्यांकडून जाहीर करण्यात येत असतात. दुचाकी, चारचाकी वाहने, गृहसंकूल प्रकल्प व्यावसायिकांकडून आकर्षक भेट योजना जाहीर केल्या जातात. ‘सेकंड होम’साठी गुंतवणूक लोकेशन व दर्जा पाहून केली जात असली तरी सध्या बाजारापेठच शांत असल्याने या व्यवसायांवरही त्याचा परिणाम होणार आहे.
गुढी उभारण्यासाठी लागणारे बांबू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कडूनिंबाचा पाला, झेंडूची फुलांची उपलब्धता होईल मात्र मिठाईची दुकानेच बंद असल्याने बत्ताशांची माळ उपलब्ध होणे अशक्य आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना उंच गुढी उभी करणे अशक्य असल्यामुळे रेडिमेड/तयार गुढींना मागणी होत असते परंतु त्यावरही निर्बंध आले आहेत.
कोरोनामुळे मासेमारी, आंबा व्यवसायावर परिणाम झाला आहे. मासेमारी ठप्प असून, आंबा तयार होत असला तरी विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आंबा व्यवसाय संकटात आला आहे. जमावबंदीच्या आदेशामुळे बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठाच बंद असल्याने पाडव्याचा मुहूर्त टळला आहे.