रत्नागिरी : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून चांगला लाभ मिळत आहे; परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार अपेक्षित प्रमाणात पुढे येत नाहीत. बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करून बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा अध्यक्ष लीलाधर भडकमकर यांनी केले आहे.
बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक साहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक साहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना अशा २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
गावातील प्रत्येक बांधकाम कामगाराला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष संकेत अंकुश कदम, जिल्हा सरचिटणीस संतोष बोरकर, तालुकाध्यक्ष प्राचीन नागवेकर, उपाध्यक्ष अमर कीर, शहर अध्यक्ष संदीप रसाळ हे बांधकाम सुरू असलेल्या जागेवर जाऊन कामगारांना मार्गदर्शन करीत आहेत. अधिक माहितीसाठी कामगारांनी जिल्हाध्यक्ष भडकमकर यांच्याशी संपर्क साधावा.
चाैकट
आवश्यक कागदपत्र
कामगार मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्ष १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकरिता गेल्या वर्षाकरिता ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि छायाचित्रासह ओळखपत्र, तसेच बँक पासबुकची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो जोडणे आवश्यक आहे.