साखरपा / आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंडीत रस्ता खचलेल्या ठिकाणी डोंगराच्या बाजूने गटारावर काॅंक्रिटीकरण करून दोनशे फूट लांब सिमेंटचे पाईप घालून पर्यायी रस्ता करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घाट रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
साखरपा बांधकाम विभागाचे उपअभियंता कौशिक रहाटे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चार दिवसात छोट्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होईल. मुर्शी व आंबा तपासणी नाका येथे साईट स्टाॅपर बसवून छोट्या वाहनांना प्रवेश तर अवजड वाहनांना बंदी असेल. मात्र, घाटातून एस. टी. बस सुरू करता येणार नाही. घाटात पावसाचा जोर व सततचे धुके असल्याने अवजड वाहने याठिकाणी फसू शकतात. त्यातून रस्ता आणखी खचण्याची भीती आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी अवजड वाहनांना परवानगी देणे धोकादायक ठरेल. पाऊस संपेपर्यंत दरीच्या खचलेल्या रस्त्यावर बांधकाम करणे शक्य नसल्याचे रहाटे यांनी स्पष्ट केले. मात्र, या भागातील रस्त्याचे काम जलदगतीने करून रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रहाटे यांनी सांगितले.
---------------------------
रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटात खचलेल्या ठिकाणी डोंगराकडील बाजूने रस्ता रूंद करण्याचे काम सुरू आहे.