लांजा : तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये सोमवारी मोठी घट झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी केवळ १९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
गेल्या महिनाभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने तालुक्यातील जनतेची चिंता वाढलेली होती. दिवसाला ३५ ते ६० च्या पुढे कोरोनाचे रुग्ण आढळत हाेते. त्याचवेळी दि. १५ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्येही रुग्णसंख्या कमी न होता वाढतच गेली होती. तसेच मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर असल्याने कोरोनाची दहशत नागरिकांच्या मनामध्ये होती. गेल्या महिनाभराच्या कालावधीनंतर सोमवारी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी करण्यात आलेल्या अँटिजन कोरोना चाचणीत ११ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच आरटीपीसीआर कोरोना चाचणीत ८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये लांजा माऊलीनगर १, प्रभानवल्ली ४, लांजा शहर ५, लांजा रेस्टहाऊस १, लांजा हायस्कूलच्या मागे १, लांजा पोलीस वसाहत २, लांजा साटवली रोड १, हर्दखळा बौद्धवाडी १, शिपोशी १, लांजा गोंडेसखलरोड १, बापेरे येथे १ रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १६३४ झाली आहे. यामधून १२१२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सायंकाळी तालुक्यात ३५६ कोरोना रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर ६६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.