आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आज (गुरुवार) आमदार सदानंद चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी खंडागळे यांच्या उपस्थितीत पार पडले. मात्र, या कामाच्या श्रेयावरुन उद्घाटनापूर्वी मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांत संघर्ष निर्माण झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. आरवली येथील उपकेंद्रासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष जगदीश परकर यांनी २१ आॅक्टोबर २०१० रोजी मागणीचे पत्र दिले होते. त्यानंतर यावर आरोग्य विभागानेही तातडीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पूर्तता करण्यात आली. मात्र, उद्घाटनाच्यावेळी येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी श्रेय लाटण्यासाठी आपल्याला डावलून हा कार्यक्रम आटोपण्याचा निर्णय घेतला, असा आरोप परकर यांनी केला आहे.उद्घाटन जाहीर झाल्यानंतर मनसेतर्फे या घटनेचा निषेध करणाऱ्या पत्रांचे बॅनर आरवलीत लावण्यात आल्याने सेना व मनसे कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपसभापती संतोष थेराडे यांनी हे बॅनर काढण्याचा प्रस्ताव मनसे कार्यकर्त्यांसमोर ठेवला. मात्र, संतप्त मनसैनिकांनी तो प्रस्ताव धुडकावला मात्र, पोलीस निरीक्षक मनोहर चिखले यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा तणाव निवळला.(वार्ताहर)
आरवली उपकेंद्र उद्घाटनात शिवसेना-मनसेमध्ये संघर्ष
By admin | Updated: August 14, 2014 22:40 IST