गुहागर : काेराेनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. गुहागरातील शासकीय रुग्णालयाच्या आवारातही असा प्रकल्प उभारण्यात येत असून, प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचआय आणि एचएलएल इन्फ्रातर्फे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मंडणगड, खेड आणि रत्नागिरी येथे आणखी तीन प्रकल्प होणार आहेत. गुहागर शासकीय रुग्णालयाच्या आवारातील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे. मुंबई - गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. याठिकाणची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. या ऑक्सिजन प्रकल्पातून मिनिटाला १०० लीटर ऑक्सिजन तयार होणार आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयाला लोटे एमआयडीसीतून ऑक्सिजन आणावा लागत आहे. गुहागर येथील प्रकल्प सुरू झाल्यास या प्रकल्पातून तालुक्यातील आरोग्य केंद्र व खासगी रूग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करता येईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत दाभोळे यांनी सांगितले.
------------------------
गुहागरातील शासकीय रुग्णालयाच्या आवारातील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे.