रत्नागिरी : सध्या निवडणुका नसल्या तरी निवडणूक विभागाचे काम सतत सुरूच असते. सध्या भारत निवडणूक आयोगाच्या ॲपद्वारे मतदान यंत्रांची भाैतिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक शाखेतील ४७१२ मशीनची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगातर्फे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद आदींच्या निवडणुका घेतल्या जातात, तर राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतात. सध्या भारत निवडणूक आयोगाकडून कुठल्याही निवडणुकांचे काम नसले तरी अन्य निवडणुकांशी संबंधित कामे वर्षभर सुरूच असतात. भारतीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून इतर निवडणुकांसाठी वापरल्या जातात.
सध्या भारत निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांच्या भौतिक तपासणीची मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ॲपद्वारे ही भाैतिक तपासणी करण्यास १५ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. आयोगाच्या या ॲपद्वारे मतदान यंत्राच्या बारकोडची पडताळणी केला जाणार आहे. मतदान यंत्राचा क्रमांक आणि हा बारकोड क्रमांक याची लेखी पडताळणी केली जातेच. पण भारत निवडणूक आयोगाच्या ॲपद्वारे ही पडताळणी करण्यात येत आहे.
येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाैतिक तपासणी सुरू झाली आहे. २४२० मतदान यंत्रे (B.U.), ११९९ कंट्रोल युनिट (C.U.) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनची भौतिक तपासणी सुरू आहे. ही तपासणी २४ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. सध्या बी. यू. आणि सी. यू. या यंत्रांची भौतिक तपासणी पूर्ण झाली असून, व्हीव्हीपॅट मशीनचीही तपासणी दोन दिवसांत पूर्ण होइल, अशी माहिती बनसोडे यांनी दिली.