कणकवली: सर्वत्र साहित्य क्षेत्रात प्रांतवाद, जातीयवाद, भाषावाद जाणवतो. परंतु कोकणातील साहित्यक्षेत्रात आजही असा भेद नाही. आजही कोकण प्रांतात साहित्यिकांत एकात्मभाव आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केशवसुत कोकण साहित्य यात्रेचा रविवारी करूळ येथे प्रारंभ झाला. या यात्रेचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार राऊत यांच्या हस्ते नारळ फोडून करूळ येथील मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयात गं्रथदिंडीचा प्रारंभ झाला. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात ग्रंथदिंडीला खासदार राऊत, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आदींनी खांद्यावर घेतले. ग्रंथालयापासून नाथ पै प्रबोधिनी हायस्कूलपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. हायस्कूलमध्ये उद्घाटनपर कार्यक्रम झाला. यावेळी खासदार राऊत, मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त भास्कर शेटये, अरूण नेरूरकर, एल.बी.पाटील, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष अॅड. हर्षद गावडे, विलास साळसकर, जयेंद्र रावराणे, डॉ. विद्याधर करंदीकर, नाथ पै प्रबोधिनी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष अनुप कर्णिक, भरत गावडे, मधुसूदन नानिवडेकर, रूजारिओ पिंटो, दादा मडकईकर, वृंदा कांबळी, कल्पना बांदेकर, वैशाली पंडीत, पत्रकार शशी सावंत, अशोक करंबेळकर, करूळ माजी सरपंच दत्तात्रय फोपे आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत म्हणाले की, ग्रंथदिंडीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी आम्हाला मिळाली असली तरी तुम्ही साहित्यिकांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत रहावे आणि आम्ही तुमच्या आज्ञा पाळू. याच हेतूने आम्ही दिंडीत सहभागी झालो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही फिरलो. परंतु कोकणात काम करण्याचा आनंद वेगळा कारण साहित्यिकांसारख्या गुणवंत लोकांबरोबर काम करताना साथ मिळते. सिंधुदुर्गात बीएसएनएलच्या साथीने विद्यार्थ्यांसाठी ई-क्लासची संकल्पना राबवण्याचे धाडस केले. तेव्हाही मुंबईतील उद्घाटन कार्यक्रमासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लगेचच मधु मंगेश कर्णिक यांना बोलवण्यास सांगितले, असे गौरवोद्गार विनायक राऊत यांनी काढले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी प्रास्ताविक केले. मधुभार्इंनी लावलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता परिषदेचे साम्राज्य उभे राहिले असून नवोदित साहित्यिक वाढावेत म्हणून ही चळवळ हाती घेण्यात आली आहे. ‘कोमसाप’चे विश्वस्त एल.बी.पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात एकेकाळी कोकणाचे नाव नव्हते. मधुभार्इंच्या प्रयत्नांमुळे कोकण मुख्य प्रवाहात आला आणि कोकणातील साहित्यिक मानाने उभा राहिला.कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, आजचा दिवस कोमसापच्या वाटचालीतील महत्त्वाचा दिवस आहे. मधुभार्इंनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून विखुरलेला कोकण साहित्यिक दृष्ट्या एकात्म केला. संस्थेची प्रगती झाली की वाटचाल यशस्वी म्हटली जाते. ‘कोमसाप’चा आलेख सातत्याने प्रगतीचा आहे. पैशाचा येथे डामडौल नाही तर साहित्यिकांचे राज्य आहे. नाथ पै प्रबोधिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी आभारप्रदर्शन केले. करूळ येथून दिंडी सुकळवाड येथे रवाना झाली. सायंकाळी कणकवलीत प. पू. भालचंद्र आश्रमात कविसंमेलन झाले. (प्रतिनिधी)संघटीत कार्य करणारी ‘कोमसाप’: नमिता कीरकोकणच्या साहित्यक्षेत्राला कोमसापने अस्मिता दिली. लोक लिहिते झाले. माणसे लिहायला लागली म्हणजे विचार करू लागली. संघटीतपणे कार्य करणारी कोमसापही महाराष्ट्रातील एकमेव साहित्यिक संस्था असावी. मालगुंड येथील केशवसुत स्मारक हेसुद्धा परिषदेचे वेगळेपण आहे. राज्यात अन्यत्र साहित्यिकांचे स्मारक उभे राहिलेले नाही, असे प्रतिपादन कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी केले.
‘कोमसाप’च्या साहित्य यात्रेला प्रारंभ
By admin | Updated: November 15, 2015 23:46 IST