लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नगर परिषदेने आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात सुसज्ज कोविड केंद्र शुक्रवारपासून जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहे. २५ बेड्सची सुविधा करण्यात आली असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चार तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय पथकांच्या सहकार्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणार आहेत.
नगर परिषद रुग्णालयात सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी चार तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय नऊ नर्सेस, सहा वॉर्डबॉय, दोन आया कार्यरत राहणार आहेत. रुग्ण दाखल करून घेणे, कार्यालयीन कामासाठी डाटा ऑपरेटर व अन्य कर्मचाऱ्यांची तसेच रुग्णालयासाठी सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
रुग्णालयासाठी आवश्यक पाणी, विजेची, तसेच जनरेटर सुविधा उपलब्ध करण्यात आली असून औषधे, इंजेक्शन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक रेफ्रीजरेटर उपलब्ध करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांना दोन वेळचे जेवण, सकाळी चहा, नाश्ता व सायंकाळचा चहा मोफत दिला जाणार आहे. रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बैठक व्यवस्था उभारण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णासाठी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असेल. गंभीर रुग्णांना अन्यत्र हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
...................................
रुग्णालयासाठी आवश्यक सर्व सुविधा व साहित्यांची उपलब्धता झाल्यानंतरच रुग्णालय रुग्णांसाठी शुक्रवारपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच त्यांचे वैद्यकीय पथक रुग्णसेवा बजावणार आहेत. २५ बेड्स रुग्णालयात उपलब्ध आहेत. दोन बेड्स पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी, नगर परिषद