रत्नागिरी : दामदुप्पट लाभाच्या योजनांचा भूलभुलय्या निर्माण करीत रत्नागिरीकरांना हातोहात चुना लावणाऱ्या सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फसवणूक केलेल्या ग्राहकांच्या तक्रारींची संख्या वाढतच आहे. आज (शुक्रवार) सायंकाळपर्यंत शहर पोलीस ठाण्याने दाखल करून घेतलेल्या तक्रारींची संख्या १७५ वर पोहोचली असून, फसवणूक केलेली रक्कमही आता ५ कोटी ३७ लाखांवर पोहोचली आहे. सॅफरॉनविरोधात गेल्या आठवड्यात रत्नागिरी शहरात पहिली तक्रार दिनार भिंगार्डे यांनी दाखल केली. त्यानंतर तक्रार दाखल करणाऱ्यांची रांग लागली आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या फसवणुकीविरोधात फसलेल्या गूंतवणूकदारांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा फसलेल्या गुंतवणूकदारांचा आरोप आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सॅफरॉनविरोधातील वादळ रत्नागिरीत जोरात घोंगाऊ लागले.तक्रार दाखल करण्यात भिंगार्डे यांनी पुढाकार घेतल्यानंतर अनेकजण पुढे आले. फसलेल्या लोकांची संख्या पाहता शहर पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी तक्रारी दाखल करून घेण्यास सुरूवात केली. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन करीत फसलेल्या लोकांना न्याय मिळावा, अशी ठाम भूमिका घेतली. याच काळात सॅफरॉनचा सूत्रधार शशिकांत राणे याला तेथील पोलिसांनी मुलुंड (मुंबई) येथे अटक केली, तर त्यानंतर दोनच दिवसात रत्नागिरी शहर पोलिसांनी सॅफरॉनच्या रत्नागिरी कार्यालयात त्यावेळी कार्यरत असलेल्या ऐश्वर्या गावकर व रश्मी मांडवकर या दोन महिला कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्या घरांच्या झडतीत गुंतवणूकदारांची अनेक कागदपत्र, बॅँक पासबुक्स, मालमत्तांची कागदपत्र, चेकबुक्स आढळली. या पुराव्यांमुळे पोलिसांची ही कारवाई अधिक भक्कम झाली आहे. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सॅफरॉनच्या मुख्य सूत्रधाराला लवकरच रत्नागिरी पोलीस ताब्यात घेतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक मिसर यांनी व्यक्त केला आहे. सॅफरॉनकडून झालेल्या फसवणूकप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या ऐश्वर्या गावकर व रश्मी मांडवकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. या दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.राणे याने फसवणूक केल्यानंतर कोणत्या मालमत्तांमध्ये गूंतवणूक केली, त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागत आहेत. त्यामुळे आपले बुडलेले पैसे परत मिळण्याबाबत गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
‘सॅफरॉन’ने लावलाय करोडो रूपयांचा चुना
By admin | Updated: June 28, 2014 00:32 IST