रत्नागिरी : इंटरनेट, संगणकीय युगातही लक्ष्मी पूजनासाठी खास ‘चोपडी’ विकत घेतली जाते. धनाबरोबर वही पूजन, चोपडी पूजन करण्यात येते. त्यामुळे चोपडीच्या पूजनासाठी लागणाऱ्या वह्या सध्या बाजारात विक्रीला आल्या आहेत.संगणक येण्यापूर्वी व्यावसायिक मंडळी चोपडीवर हिशेब लिहून ठेवला जात असे. दररोजचे हिशेब, वसुली, येणे याचे लिखाण केले जात असे. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नवीन चोपडी किंवा वहीचे पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून नवीन वहीत व्यवहार सुरू व्हायचे. मात्र, संगणक आल्यानंतर त्यावर हिशेब मांडले जाऊ लागले. केवळ पूजनापुरती वही विकत घेतली जायची. मात्र, संगणकावर येणारे व्हायरस किंवा मॅटर करप्ट होत असल्याचा धोका लक्षात घेऊन पुन्हा चोपडीवर लिखाण करणे सुरू झाले आहे. त्यामुळे वह्यांची मागणी वाढली आहे.ही जुनी परंपरा रत्नागिरीतील व्यापारी आजही जपत आहेत. पारंपरिक लक्ष्मी पूजनासाठी लागणारे सर्व साहित्य प्रत्येक दुकानात आणले जाते आणि सायंकाळी शुभमुहुर्तावर ही पूजा केली जाते. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. छोट्या वह्या १५ ते २० रुपये, त्याहून मोठ्या ४५ ते ५० रुपये, दैनंदिन व्यवहाराच्या १७५ पासून ५०० रुपयांपर्यंत किमतीच्या वह्या विक्रीला उपलब्ध आहेत. गतवर्षीपेक्षा वह्यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. संगणकावर वर्षानुवर्षाचे व्यवहार सेव्ह करणे सोपे ठरते. परंतु व्हायरस अथवा तांत्रिक समस्येमुळे फाईल करप्ट झाली तर काहीच करता येत नाही.अशा वेळी वहीवरील हिशेबाची माहिती उपयुक्त ठरते. त्यामुळे हिशेब वह्यांवरच लिहिण्याकडे व्यापारीवर्गाचा कल अधिक आहे. त्यामुळे गुलाबी रंगाच्या वह्यांवर महालक्ष्मी किंवा गणपती चित्राच्या मुखपृष्ठाच्या वह्यांना विशेष मागणी होत आहे.रत्नागिरी शहरातील किरकोळ दुकानदार, विविध व्यावसायिक, सराफ आदी चोपडी पूजन विधीवत करताना दिसतात. ही परंपरा आजच्या संगणकीय युगात आजही सुरु आहे. (प्रतिनिधी)
इंटरनेटच्या युगात आजही चोपडीला मागणी
By admin | Updated: November 8, 2015 23:39 IST