फोटो - चिपळूण शहरातील चिंचनाका येथे पोलिसांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर छावणी उभारली आहे. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या संचारबंदीसाठी येथील प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. शहराच्या सीमा सील करण्यात आल्या असून त्यासाठी पाच ठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागातील एस.टी. बस सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून केवळ रत्नागिरी, खेड व पोफळी या मार्गावर ही सेवा सुरू राहणार आहे.
वाढत्या कोरोनाच्या पादुर्भावामुळे शनिवार व रविवार हे दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ‘विकेंड लॉकडाऊन’ असल्याने दोन दिवसांसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या संचारबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नगर परिषदेनेही शहरात रिक्षा फिरवून किरणा माल व अन्य दुकाने दोन दिवस बंद राहतील. तसेच सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवा सुरू राहील, असे आवाहन केले.
या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील लॉकडाऊनप्रमाणे शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स उभारून सर्व सीमा सील केल्या आहेत. तसेच शहरातील उक्ताड, नाईक कंपनी बाजारपूल, फरशी तिठा, चिंचनाका, पाग देसाई बाजार या ठिकाणी टेंथ उभारले आहेत. बहाद्दूरशेख नाका येथे व अन्य ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.