चिपळूण : शहरात दीड वर्षापूर्वी नगर परिषद प्रशासनातर्फे प्लास्टिकविरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. व्यावसायिकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. नागरिकांनी कापडी पिशवीचा वापर करावा, असेही सांगण्यात आले. मात्र, सध्या शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या गटारांमध्ये प्लास्टिक पिशव्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगा जप्त करुन काही व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा, असे आवाहन करून जनजागृतीपर पत्रकांचेही वाटप करण्यात आले होते. प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर व्हावा, या हेतूने शहरातील काही महिला बचत गटांना या पिशव्या शिवून देण्याबाबत आवाहनही करण्यात आले होते. मात्र, कापडी पिशव्यांऐवजी बाजारपेठेत आता पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या सर्रास आढळून येत आहेत. संबंधित यंत्रणेचे या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याने बाजारपेठेतील गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषद प्रशासन प्लास्टिकविरोधी मोहीम पुन्हा राबविणार अथवा कसे, याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. चिपळूण शहरातील अनेक प्रभागात सध्या स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या भागात स्वच्छता मोहीम आखली जाते. गटारे साफ केली जातात. प्रत्यक्षात नंतर गटारे तशीच तुडूंब भरलेली असतात. सध्या खड्डे व अस्वच्छता हे शहराचे दोन प्रश्न आहेत. त्या मुद्द्यांवर आता चर्चा करून प्लास्टिक हटावमोहीम पुन्हा हाती घ्यावी लागेल. (वार्ताहर)
चिपळूणला प्लास्टिक मोहिमेचा विसर
By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST