चिपळूण : मुलगा हाच वंशाचा दिवा आहे, असा समज पूर्वीच्या काळी होता. परंतु, मुलांप्रमाणे मुलीही विविध क्षेत्रात व उद्योगधंद्यात यशस्वी होऊ शकतात, असा विश्वास २१व्या शतकात निर्माण झाल्याने मुलींच्या जन्माचे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत स्वागत केले जात आहे. याचा प्रत्यय चिपळूणसारख्या भागात लोकांना दिसून येत आहे. या जागृतीमुळे मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक असल्याचे दिसत आहे. चिपळूण नगरपरिषद दवाखानाअंतर्गत गेल्या वर्षभरात मुलांच्या जन्माचे प्रमाण ३४७, तर मुलींच्या जन्माचे प्रमाण ३६४ आहे. गरोदर महिलांची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास जन्माला येणारे मूल सुदृढ व निरोगी बनते. यादृष्टीने राज्य शासनातर्फे गरोदर महिलांसाठी सरकारी रुग्णालयामध्ये विविध सेवा सुविधा उपलब्ध आहेत. बाळ जन्माला येण्याच्या आधीपासून ते जन्माला येईपर्यंत त्याची काळजी घेतली जाते. गरोदर महिलांची रक्त तपासणी, आवश्यक औषधोपचार सुरुवातीपासून केले जातात. आरोग्यसेविका घरोघरी भेटी देऊन महिलांना मार्गदर्शन करीत असतात, अशी माहिती नगरपरिषदेतील आरोग्यसेविका कविता खंदारे यांनी दिली. गरोदर महिलांची आॅनलाईन माहितीही भरली जाते. त्याचप्रमाणे आठवी ते दहावीत शिकणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्य शिक्षणाची माहिती देऊन त्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येते. आवश्यक विद्यार्थी, विद्यार्थिनीस नगर परिषदेतर्फे मोफत औषधोपचार केले जातात. धनुर्वात प्रतिबंधक लसही दिली जाते. भावी पिढी तंदुरुस्त व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. गरोदर महिलांबरोबरच मलेरियाबाबत विशेष जनजागृती अभियान शहरातील शाळांमध्ये सुरु आहे. यामध्ये साथीच्या आजारांबाबत विद्यार्थी-विद्यार्थिनींना माहिती दिली जात आहे. ताप आढळल्यास संबंधित रुग्णांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्या अनुषंगाने संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार करणे शक्य होते. घरात मुलगाच जन्मला पाहिजे, अशी जुन्या लोकांची धारणा होती. परंतु, आता यामध्ये हळूहळू बदल होऊ लागला असून, स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाणही कमी झाले आहे. मुलांप्रमाणेच मुलींच्या जन्माचे स्वागत केले जात आहे. गेल्या वर्षीच्या जन्माच्या नोंदीमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. चिपळूण शहरातील मुले व मुलींच्या प्रणाणातील जनन दर पाहता मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. (वार्ताहर) कामगारांच्या किमान वेतनात वाढ
चिपळुणात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक
By admin | Updated: July 4, 2014 00:17 IST