लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुराच्या तडाख्याने येथील २३७ सार्वजनिक मालमत्ताना फटका बसला. या पुरामध्ये येथील पोस्ट कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले आहे. तब्बल अठरा दिवसांनंतर मंगळवारी या कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
महापुरात बहुतांशी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले, तसेच ११,९९३ कुटुंबीयांना फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे अजूनही येथील शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्वपदावर आलेले नाही. यामध्ये येथील पोस्ट कार्यालयाचाही समावेश होता. येथील पोस्ट कार्यालय काहीसे उंचावर असूनही त्या ठिकाणी पाच फुटांपर्यंत पाणी होते. २००५ मधील महापुराच्या पाण्याची पातळी लक्षात घेत, या कार्यालयाचे नूतनीकरण केले होते. मात्र, तरीही या कार्यालयात पाणी शिरल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांसह काही यंत्रणेचेही नुकसान झाले आहे. त्यातच इतर वास्तुंप्रमाणे या कार्यालयातही प्रचंड चिखल होता. त्यामुळे काही दिवस साफसफाईतच गेले.
महापूर ओसरल्यानंतर या पोस्ट कार्यालयाची साफसफाई तत्काळ सुरू करण्यात आली. त्यानंतर, ही येथील यंत्रणा पूर्वपदावर येण्यासाठी अठरा दिवसांचा कालावधी लागला. अखेर मंगळवारपासून या कार्यालयातील कामकाजाला सुरुवात झाली. पेन्शनधारक, बचत खाती व अन्य व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवारी ग्राहकांनी येथे गर्दी केली होती. अजूनही या कार्यालयातील काही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र, या आठवडाभरात संपूर्ण यंत्रणा सुरू होईल, असे अपेक्षित आहे.