अडरे : केंद्र सरकारने केलेेली इंधन व खतांची दरवाढ तसेच सर्वच स्तरावर महागाई वाढल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईविरोधात चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साेमवारी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे महागाईचा निषेध करण्यात आला.
गेल्या महिनाभरात सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केलेली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. पूर्वी शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने शेती करत असे. मात्र काही वर्षांत शेतीत आमूलाग्र बदल झाल्याने शेतकरी आता ट्रॅक्टर व पाॅवर टिलरच्या माध्यमातून शेती करत आहे. आधुनिक शेतीसाठी डिझेल, पेट्रोल वापरल्याने खर्च जादा व वेळ कमी लागत आहे. पेट्रोल, डिझेल व इंधन दरवावाढीबरोबरच सर्वच क्षेत्रात तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. तसेच रासायनिक खत तयार करणाऱ्या कंपन्यांनी खतांची दरवाढ केल्याने अजूनच शेतकरी भरडला जाणार आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ व इंधनाचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शौकत मुकादम, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सतीश खेडेकर, अविनाश हरधारे, मुराद अडरेकर, नगरसेवक बिलाल पालकर, फैरोजा मोडक, विलास चिपळूणकर, समीर जानवलकर, खालिद दाभोळकर, नाना भालेकर, प्रकाश पवार, माजी नगरसेवक रमेश खळे, नदीम उंडरे, अक्षय केदारी, विलास गमरे, संदीप चिपळूणकर, जफर कटमाले, प्रणव भोसले, वात्सल्य शिंदे उपस्थित होते.
--------------------
पेट्राेल, डिझेल दरवाढीविराेधात चिपळूण राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले.