चिपळूण : शहरातील बाजारपेठेत पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बाजारपेठेतील सहा दुकाने फोडून चोरट्यांनी १३ जार ९०० रुपयांची रोकड पळविली. या चोरट्यांनी खाद्यपदार्थांवर ताव मारत अडीच हजारांहून अधिक रकमेचा ऐवज फस्त केला. ही घटना काल, गुरुवारी रात्री घडली. चिपळूण बाजारपेठेत गेले काही महिने पोलिसांची गस्त सुरू आहे. पोलीस यंत्रणा सतर्क असूनही मच्छी मार्केट ते बॅ. नाथ पै चौकादरम्यान चोरट्यांनी सहा दुकाने फोडली. गुरुवारी रात्री व्यापारी आपापली दुकाने बंद करून नेहमीप्रमाणे घरी गेले. त्यानंतर सुनील रेडीज यांच्या सुनील कोल्ंिड्रक्स या दुकानाचे शटर कापून चोरट्यांनी ५०० रुपयांची चिल्लर, १२ हजार रुपयांची रोकड पळविली. ही रक्कम पळवितानाच २०० रुपयाचे थंडपेय व २०० रुपयांचे आइस्क्रीम व १५० रुपयांची कॅडबरी चोरट्यांनी खाऊन फस्त केली. प्रवीण तटकरे यांच्या ईगल हॉटेलमध्ये ९०० रुपयांची चिल्लर व दोन हजार रुपयांचे चिकन लॉलिपॉप, चिकनचिली, आदी पदार्थ चोरट्यांनी खाल्ले. अनंत केशव खातू यांच्या किराणा मालाच्या दुकानातील ५०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी लांबवली. कास्कर अँड कंपनी, नथुराम शंकर दळी, दिलखूश सलून अशा दुकानांमध्येही चोरट्यांनी प्रवेश केला; परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते; परंतु याबाबत कोणतीही तक्रार नसल्याने पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
चिपळूण बाजारपेठेत सहा दुकाने फोडली
By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST