चिपळूण : नगरपरिषद हद्दीत अंदाजे १५० सार्वजनिक व खासगी विहिरी आहेत. गेली अनेक वर्षे या विहिरींच्या पाण्याचा उपयोग होत नसल्याने या विहिरींकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या विहिरींची साफसफाई करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे हे काम लवकरच होणार आहे. चिपळूण शहराची लोकसंख्या ५७ हजार आहे. शहर व परिसराला खेर्डी व गोवळकोट पंप हाऊस येथून नगर परिषद प्रशासनातर्फे पाणी पुरवठा केला जातो. सुधारित नळपाणी योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. गेली ७ वर्षे या योजनेचे काम सुरु असून, यासाठी अंदाजे १५ कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजनेचे काम करणारे ठेकेदार चंद्रकांत सुवार यांना कामाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, सुधारित नळपाणी योजनेची प्रतीक्षा शहरवासीयांना करावी लागत आहे. पाणी हे जीवन आहे. दैनंदिन व्यवहारात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहर व परिसराला जुन्याच नळपाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक घरात व वाडीत नळ असल्याने जुन्या पारंपरिक विहिरींकडे सध्या दुर्लक्ष झाले आहे. नळाच्या पाण्यावरच शहरवासीयांना अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्यात काही वेळा नगर परिषद प्रशासनाला व्यत्यय आल्यास या नैसर्गिक दुर्लक्षित पाण्याचा स्त्रोतांचा उपयोग होऊ शकतो. वाशिष्ठी नदीतील पाणी उपसा करुन पंपाद्वारे हे पाणी शहरवासीयांना पुरविले जाते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात नदीतील पाण्याच्या पातळीत घट होते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. या अनुषंगाने संभाव्य पाणी टंचाईवर पर्याय म्हणून उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी शहर व परिसरातील सार्वजनिक व खासगी विहिरींची साफसफाई करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, टेंडर प्रक्रियाही झाली आहे. सध्या काही विहिरींना पाणी असून, स्वच्छता करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, पाऊस गेल्यानंतर विहिरींची साफसफाई करुन या पडिक विहिरी पाण्यासाठी वापरात येणार आहेत. प्रत्यक्षात या कामाची कार्यवाही होईपर्यंत नागरिकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, विहिरींची स्वच्छता झाल्यास एखाद्या वेळेस पाणी आले नाही तर विहिरीच्या पाण्यावर तहान भागवता येणे शक्य होणार आहे. (वार्ताहर)
चिपळूण :विहिरींची साफसफाई
By admin | Updated: October 7, 2014 22:06 IST