चिपळूण : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी निवडलेल्या ५ गावांच्या विकासासाठी १३ कोटी ६५ लाखांची कामे वर्षभरासाठी मंजूर करण्यात आली आहेत. यातील गाणे येथे २ कामे सुरु झाली आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व टँकरमुक्त गावाची घोषणा करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना आणली. प्रत्येक तालुक्यातून पाच गावांची या योजनेसाठी निवड करण्यात येत आहे. त्या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये विकासासाठी विशेष निधी मंजूर केला जातो. जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक टंचाईग्रस्त गावे पाणीटंचाईतून मुक्त होण्यास मदत होणार आहे.चिपळूण तालुक्यातील गाणे, अनारी, कोसबी, कात्रोळी, केतकी या ५ गावांचा या योजनेत समावेश आहे. या पाचही गावांना दरवर्षी पाणी टंचाईची झळ पोहचते. या गावांची निवड झाल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावात करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला. यासाठी १३ कोटी ६५ लाखाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.कृषी विभागाअंतर्गत १९७ कामे असून त्यासाठी ३ कोटी ३७ लाखांचा निधी खर्ची पडणार आहे. पाणी पुरवठ्याची ५८ कामे असून, त्यासाठी ५३ लाखांची तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत धरण, नालेबंधारा, वळण बंधारे अशी लहान मोठी कामे होणार आहेत. अशा विविध कामांतून पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात येणार आहे. या गावांमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध कामांना सुरूवात झाली आहे.सध्या कृषी विभागातर्फे गाणे गावातील सिमेंट नाला बांध व वळण बंधारा ही कामे सुरु आहेत. उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागतील असा प्रयत्न सुरु असल्याचे चिपळूणचे उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)बंधारेही होणार...गाणे गावातील दोन कामे पूर्ण.पाणी पुरवठ्यासाठी ५३ लाखांची तरतूद.कृषी विभागासाठी ३ कोटी ३७ लाखांची तरतूद.लघुसिंचन योजनांमधून पाणी साठवण्यासाठी बंधारे होणार.गाणे, अनारी, कोसबी, कात्रोळी, केतकी या गावांचा योजनेत समावेश.
चिपळूणसाठी १३ कोटी ६५ लाख
By admin | Updated: March 26, 2015 00:13 IST