रत्नागिरी : शहरातील बस वाहतुकीच्या मार्गामध्ये अचानक बदल करण्यात आला असल्यामुळे प्रवाशांना तिकीट दरवाढ सोसावी लागत आहे. शहर बसवाहतुकीच्या सडामिऱ्या, मिऱ्याबंदर, काळबादेवी, सड्ये, आरे, साखरतर, कासारवेली, आडी, शिवरेवाडी मार्गावरील वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आल्याने प्रवासामध्ये ३ ते ५ रूपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. मार्ग बदलल्यामुळे किलोमीटर वाढले म्हणून प्रवाशांना त्याचा भुर्दंड बसत आहे. रत्नागिरी शहर बसस्थानकातून निघालेल्या बसफेऱ्या जाताना काँगे्रस भुवनमार्गे लक्ष्मी चौक आणि त्या त्या मार्गाने जातात. मात्र, येताना लक्ष्मीचौकातून भैरी सहाणेच्या पुढे मुरलीधर मंदिर, मांडवी भुतेनाका, आठवडा बाजार ते बसस्थानक असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यवय होतोच, शिवाय प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. शहरातील अरूंद रस्ते, वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मार्गबदलाचा निर्णय घेतला आहे. मार्गबदलामुळे तिकिटांचे दर वाढले. यामुळे विद्यार्थीपासच्या दरातही वाढ होणार आहे.लवकरच शाळा सुरू होणार आहेत. शाळा, महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांनाही पाससाठी वाढीव किंमत मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)