दापोली : केंद्राने एनडीआरएफचे निकष बदलावे तरच इतर राज्यांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्र किंवा इतर राज्यांनाही मदतीची गरज आहे. वेगवेगळे पॅकेज देण्यापेक्षा एनडीआरएफ मदतीचे निकष बदलावे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी दापाेली येथे शनिवारी व्यक्त केले़
चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेत़े यावेळी त्यांनी दापाेलीतील पंचायत समितीच्या सभागृहात काेराेनाचा आढावा घेतला़ त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते़ सुनील तटकरे यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ केंद्राची टीम राज्यामध्ये दौरा करून गेली़ परंतु केंद्राकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही़ चक्रीवादळात पुन्हा एकदा मच्छीमार, आंबा बागायतदार व कोकणी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यामुळे केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे़ परंतु, केंद्र सरकार इतर राज्यांना मदत देण्यासाठी काय निकष लावत आहे हेच पाहणे गरजेचे आहे़ गुजरात राज्याला चक्रीवादळाचा थेट फटका बसल्यानंतर देशाचे पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर गेले़ या भागाची पाहणी करून त्यांनी गुजरात राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ त्यांना जरूर मदत मिळावी, परंतु इतर राज्यांनाही गुजरात सारखाच फटका बसला आहे़ त्यामुळे गुजरातच्या धर्तीवर इतर राज्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले़
दापोली पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बांधकाम, आरोग्य विभाग, वन विभाग, कृषी विभाग या सर्वच विभागाच्या आढावा यातून जनतेला त्रास होणार नाही, असे काम करा़ गतिमान प्रशासन राबवा, लॉकडाऊन काळामध्येसुद्धा पेरणीचा हंगाम लक्षात घेऊन कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू असावीत, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या़ तसेच तालुक्यासाठी पुन्हा एक शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करावे, अशा सूचना दिल्या़
दापाेली येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीवेळी पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, माजी आमदार संजय कदम नगरसेवक खालीद रंखागे, किशोर देसाई, ऋषिकेश गुजर, माजी सभापती राजेश गुजर, ममता शिंदे, मुजीब रुमाणे, जयवंत जालगावकर, किशोर साळवी, चंद्रकांत बैकर, दीपक खळे, विजय मुंगसे उपस्थित होते़
------------------------
केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात निकष बदलून मदत मिळणे गरजेचे होते़ परंतु, केंद्राने निकष बदलले नाहीत त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी तिप्पट मदत दिली होती़ यावेळेसही केंद्राकडून मदत मिळाली नाही तरीही राज्य सरकार काेकणातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही़ महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोकणी जनतेला दिलासा देईल, असे सुनील तटकरे म्हणाले़