खेड : शिवतेज आरोग्य संस्थेच्या इमारतीत नवीन कोविड केअर सेंटरचे उद्घाटन खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी शिवतेज आरोग्य संस्थेची इमारत शासकीय कोविड सेंटरसाठी दिली असून, या इमारतीत १०० बेडची सुविधा करण्यात आली आहे.
दापोली, खेड व मंडणगड तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी आमदार योगेश कदम यांनी हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांना मोफत चहा, नाष्टा, जेवण पुरविण्यात येणार आहे. चोवीस तास अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी जनरेटरची सोय करण्यात आली आहे.
या कोविड सेंटरमध्ये तालुका आरोग्य विभागातर्फे चार वैद्यकीय अधिकारी सेवा देणार आहेत. यामध्ये डॉ. अजिंक्य जगन्नाथ बकाळ, डॉ. विकास विलास ढवळे, डॉ. संतोष प्रकाश वानखेडे व डॉ. महेश यशवंत म्हस्के यांचा समावेश आहे. कोविड सेंटरमध्ये चार परिचरिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विमल बबन पवार, सोनाली तोरणे, पूजा प्रमोद सावंत व शुभम शरद भिंगे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सोफिया शेख व डॉ. चेतन कदम यांची दिवसाच्या सत्रात, तर डॉ. किरण पाटील यांची रात्रीच्या सत्रात रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या सेंटरच्या उद्घाटनाला आमदार योगेश कदम, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बाळासाहेब सगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन शेळके उपस्थित होते.