आवाशी : पावणेतीन कोटींच्या केटामाईन या नशिल्या पदार्थांची विक्री करणारे बळ माजलोटे पंचक्रोशीतील स्थानिक तरुण पोलिसांनी मुद्देमालासह पकडल्याने त्याचबरोबर हा पदार्थ लोटे औद्योगिक वसाहतीतीलच कंपनीचा असल्याने संपूर्ण कोकणासह, जिल्हा, तालुका व औद्योगिक वसाहतीत एकच खळली आहे. कोट्याधीश व्हायला निघालेले हे स्थानिक तरुण मागील दोन वर्षांपासून या क्षेत्राशी निगडीत आहेत. ज्या सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचे हे अंमली पदार्थ आहे, त्याठिकाणी दिनेश खेराडे हा मागील आठ महिन्यांपासून ठेकेदारी तत्वावर काम करीत आहे. दिपक हा त्याचा भाऊ फार्मासिस्ट असून तो येथील दिपक नोहोकेम या कंपनीत लॅबमध्ये काम करीत आहे. तर सागर महाडीक हा पूर्वी येथील रॅलीज इंडिया कंपनीत काम करीत होता. तोही एमएस्सी असल्याने विज्ञानातील हुशारी त्याने या कामासाठी वापरली होती. गेल्या दोन वर्षापासून अशा प्रकारची कामे या तरुणांकडून केली जात होती. दिपक व सागर ज्या कंपनीत नोकरी करतात, तेथील अधिकार्यांना या नशिले पदार्थाचा पुरवठा केला जात होता. सागर ज्या कंपनीत नोकरी करतो, तेथील त्याचा अधिकारीही या प्रकरणात समाविष्ट आहे. अधिकारी सध्या बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथील व्ही. व्ही. सी. फार्मा अॅण्ड स्पेशालिटी प्रा. लि. या कंपनीचे उत्पादन सुरु होण्यापूर्वीच रितसर परवानगी न घेता गुपचूप उत्पादन घेतले जात होते. या कंपनीकडे सतत स्थानिक नागरिकांची ओरड सुरु होती. मात्र त्याकडे डोळेझाक असताना कंपनीचे मालक विकास पुरी हे जळगाव येथील शेतातील गोडावूनमध्ये १२७५ कोटी रुपयांच्या केटामाईनसह सापडले. चिंचाळे नामक व्यक्तीची ती कंपनी असून १७ डिसेंबर रोजी त्यांना इतर दहा सहकार्यांसह अटक करण्यात आली. त्यांना अद्यापही जामिन झाला नसल्याचे समजते. ज्या सुप्रिया लाईफ सायन्सेस कंपनीचे हे केटामाईन आहे त्या कंपनीचे मालक सतिश वाघ हे एक नामांकित उद्योजक म्हणून ओळखले जातात. कंपनी स्थापनेपासून ही कंपनी वायुगळती, सांडपाणी सोडणे, अपघात होणे, बोअरवेलमधून सांडपाणी जिरवणे, पिण्याच्या पाण्यात रसायन मिसळणे या ना त्या कारणाने चर्चेत आहे. याचाच अर्थ येथील सुरक्षा यंत्रणा कुचकामी असल्याचे निष्पन्न होत आहे.(वार्ताहर)
‘केटामाईन’ने वसाहतीत खळबळ
By admin | Updated: May 26, 2014 01:05 IST