आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी सील केलेला तांदूळ मुख्याध्यापक अशोक साळुंखे, संस्थाध्यक्ष चंद्रकांत येलगुडकर, शिक्षक - पालक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद शिंदे व पोलीसपाटील रमेश तुळसणकर यांनी संगनमताने पाटणकर नामक दुकानदाराला विकल्याचे समोर आले होते.यानंतर विलास पुरोहित, रमाकांत पुरोहित, प्रकाश पुरोहित, राजेंद्र बोथरे, चंद्रकांत घोसाळकर आदी ग्रामस्थांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात याबाबत निवेदन सादर केले होते. संबंधितांचे जाब जबाबही घेण्यात आले होते. मात्र, शिक्षण विभागाकडून तक्रार दाखल झाल्याखेरीज यावर कारवाई करता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक एम. आर. चिखले यांनी स्पष्ट केले होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी या सर्व प्रकरणाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना माहिती सादर करुन कारवाईबाबत मागणी केली होती. याची दखल घेत काळम-पाटील यांनी शिक्षण विभागाला तातडीने चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात मुख्याध्यापकांची नोकरी वाचवण्यासाठी काहीतरी तडजोड होईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षण विस्तार अधिकारी एस. पी. त्रिभुवने यांनी अपहार झाल्याची तक्रार संगमेश्वर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. मुख्याध्यापक साळुंखे यांच्यावर भादंवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४७७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करत आहेत. या प्रकरणात मुख्याध्यापकांशिवाय सहभागी असणाऱ्या सर्वांवरच कारवाई व्हावी, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
By admin | Updated: July 4, 2014 00:18 IST