लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महागाई गगनाला भिडू लागली आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, या परिस्थितीतही तलाठ्याच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षाही अधिक काम करणाऱ्या कोतवाल या महसूल कर्मचाऱ्याला शासनाकडून चपलांसाठी केवळ दहा रुपये भत्ता दिला जात आहे. त्यामुळे दहा रुपयांत तुटलेली चप्पल तरी दुरुस्त होते का? असा प्रश्न केला जात आहे.
शासनाच्या महसूल विभागातील तलाठ्याइतकाच महत्त्वाचा असलेला पूर्ण वेळ काम करणारा गावकामगार म्हणजे कोेतवाल. तलाठ्यासोबत कामे करणाऱ्या या कामगाराला अल्प मानधनावर राबवून घेतले जात आहे. कोतवालांना चपलेसाठी केवळ १० रुपये भत्ते देऊन शासनाकडून क्रूर चेष्टा केली जात आहे.
...........................
२०११ पासून पदाेन्नती नाही
शासनाने सेवाज्येष्ठतेनुसार दरमहा मिळणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यानुसार हे मानधन १५ हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. कोतवालाला शिपाईपदी पदोन्नती देण्याचा हा निर्णय झाला असला तरी अजूनही त्याबाबत शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक काेतवाल पदोन्नतीची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यातील अनेक कोतवाल वर्षानुवर्षे याच पदावर काम करीत आहेत. त्यांना २०११ पासून पदाेन्नती नाही.
.........................
कामांची यादी भली माेठी
- तलाठ्याच्या हाताखाली महसुलाचे काम करणे
- गावच्या दप्तराची वरिष्ठ कार्यालयात ने-आण करणे
- गावातील जन्म-मृत्यू, विवाह नोंदीची माहिती ग्रामसेवकाला देणे.
- महसूल वसुली करणे, नोटीस गावात फिरविणे.
- गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधी तसेच आपत्तीची माहिती पोलीस पाटलाकडे देणे.
...................................
पूर्णवेळ, तरीही वेतन कमी
कोतवालाची नियुक्ती तहसील यांच्याकडून केली जाते. प्रत्येक १००० लोकसंख्येमागे एका कोतवालाची नियुक्ती करण्याच्या सूचना असल्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात १७ लाख लोकसंख्येसाठी केवळ २८७ कोतवाल कार्यरत आहेत. एकूण मंजूर असलेल्या ३९४ पदांपैकी अजूनही १०७ पदे रिक्त असल्याने आहे त्याच कोतवालांना लगतच्या गावांचाही भार सांभाळावा लागत आहे. पूर्णवेळ काम करूनही त्यांना पाच हजारांवर समाधान मानावे लागते.
.....................
अपुऱ्या मानधनात कसे भागणार?
सध्या महागाई वाढली आहे. तरीही गावात तलाठ्याच्या बरोबरीने पूर्ण वेळ काम करणाऱ्या कोतवालाला मात्र अल्प वेतनावर काम करावे लागत आहे. सध्या चपलेसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागतात. मात्र, शासनाकडून केवळ १० रुपये भत्ता दिला जात आहे. ही चेष्टा आहे.
- लक्ष्मण भिलारे, कोतवाल, खेड
कोतवालला तलाठ्याच्या बरोबरीने काम करावे लागते. मात्र, पूर्णवेळ काम करूनही त्याला अपुऱ्या वेतनावर समाधान मानावे लागत आहे. या महागाईच्या काळात एवढ्या कमी मानधनावर कोतवालांचे कसे भागणार?
- शेखर सावंत, कोतवाल, नाचणे, रत्नागिरी