चिपळूण : नगर परिषदेच्या वाहन विभागासाठी नवीन अग्निशमन गाडी खरेदी करण्यासाठी शासनाकडून अद्याप निधी प्राप्त न झाल्याने नगर परिषद फंडातून ही गाडी खरेदी करण्याबाबत ९ मार्च रोजी होणाऱ्या सभेत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे गाडी खरेदी करण्यास विरोधक सहमती देणार अथवा कसे, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. नगर परिषदेची विशेष सभा २५ फेब्रुवारी रोजी श्रावणशेठ दळी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतु, शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांना सभेचा अजेंडा वेळेत न मिळाल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आली. ९ मार्च रोजी होणाऱ्या सभेमध्ये तब्बल ४६ विषयांवर चर्चा होणार आहे. शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून, याबाबत नागरिकांच्या हरकतीही आल्या आहेत. नागरिकांची बाजू शासनापर्यंत कळवण्यासाठी आलेल्या अहवालावर चर्चा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद हद्दीत शंकरवाडी, काविळतळी, बुरुमतळी येथे ५१ पथदीप बसविण्यासाठी नवीन खांब उभे करणे यासाठीच्या ६ लाख ८५ हजार ९१७ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी या सभेत घेतली जाणार आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक दर कराराने ६ विद्युत कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांची मुदत ३१ मार्च रोजी संपणार असल्याने याबाबतही चर्चा होणार आहे. सन २०१६-१७करिता ८ लाख ९४ हजार ८३९ रुपये खर्चाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी यावेळी घेतली जाणार आहे. रामतीर्थ स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत, सीसी रोड व चौथरा बांधण्यासाठी २६ लाख ७४ हजार ६१४ रुपयांच्या खर्चास आर्थिक मंजुरी यावेळी घेतली जाणार आहे. मार्कंडी येथील एलटाईप शॉपिंग सेंटरचे पत्रे बदलण्यासाठी ५ लाख ५७ हजार २८२ रुपयांच्या निविदेमध्ये अंदाजपत्रकीय दरापेक्षा ९.९० टक्के कमी दराच्या निविदेला मंजुरी दिली जाणार आहे. बुरुमतळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाजवळ असणाऱ्या रेस्ट हाऊसच्या जागेत भंगार साहित्य, डांबरी पिंप, लोखंडी साहित्य, जुने व उपयोगात न येणारे मिक्सर, बॉयलर, आदी साहित्याचा लिलाव करण्यासाठी आलेल्या अहवालावरही निर्णय घेतला जाणार आहे. नगर परिषद इमारतींची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षारक्षकांची सेवा तत्वावर नेमणूक करण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने पुढील कामाकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थायी निर्देश क्रमांक ३६ प्रमाणे पूर्वीचे मजूर ठेकेदार साईकेदार सर्व्हिसेस यांच्याकडून आलेल्या २ लाख ४ हजार खर्चास आर्थिक मंजुरी देण्याबाबत चर्चा होणार आहे. रोटरी क्लब यांनी यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी काही कामे केली असून, जयंत साडी सेंटर येथे असलेल्या नाल्याच्या पुलाला जाळी मारणे, कोलेखाजन येथील शीवनदी पुलावर जाळी बसविणे, भाजी मंडईमागील जोग गिरणीसमोर जाळी बसविणे व सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबाबतच्या अहवालावरही यावेळी चर्चा केली जाणार आहे. (वार्ताहर)कर्मचारी अप्रशिक्षित : अग्निशमनसाठी नवीन गाडी घेणे गरजेचेचिपळूणची वाढती लोकसंख्या व अचानक लागणारी आग याचा विचार करता अग्निशमन विभागासाठी नवीन गाडी घेणे गरजेचे आहे. परंतु, अग्निशमन विभागात प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. हे कर्मचारी मिळावेत, यासाठीही शासनस्तरावर पाठपुरावा केला जात आहे. अग्निशमन विभागाला कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे.उद्घाटनाची प्रतीक्षाचिपळूण नगर परिषद प्रशासनातर्फे स्वतंत्र अग्निशमन इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वी अग्निशमन गाडी खरेदी केली जाणार आहे.
नगर परिषद फंडातून अग्निशमन गाडी खरेदी
By admin | Updated: March 7, 2016 00:46 IST