रत्नागिरी : बसच्या नुकसानीबद्दल चालकास आरोपपत्र दिल्याच्या निषेधार्थवाहकांनी डबलड्युटी करण्यास नकार दिल्यामुळे मंगळवारी रत्नागिरी शहरी बस वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शहरी मार्गावरील ६३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना विशेषत: चांगलाच बसला. प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले.चालक डी. आर. शिंदे यांनी १८ आॅगस्ट रोजी ड्युटी संपवून एमएच २० बीएल ७४१ ही गाडी रत्नागिरी आगारात जमा केली. गाडी ताब्यात घेताना व जमा करताना सुरक्षारक्षक गाडी तपासून ताब्यात घेतात. सुरक्षारक्षकांनी गाडी ताब्यात घेतली असता गाडीत चढण्याच्या पायऱ्या व स्टॅड तुटलेला निदर्शनास आला. याबाबत जबाब प्रशासनाने मागितला असताना देण्यात आला नाही. प्रशासनाने महिनाभर वाट पाहूनही जबाब न दिल्यामुळे डी. आर. शिंदे यांना आरोपपत्र दिले.याबाबत चालक-वाहकांनी एकवटून आरोपपत्र चुकीचे असल्याचे सांगून डबलड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी सव्वा वाजल्यापासून शहरी मार्गावरील गाड्या रद्द झाल्या. दिवसभरात एकूण ६३ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एस. टी. स्टँडवर ताटकळत उभे रहावे लागले.पहाटे ४.१५ पासून चालक-वाहकांची ड्युटी सुरू होते. शहरी मार्गावर ४८ गाड्या असून, दररोज ९६८ फेऱ्या धावत असतात. चालक-वाहक प्रत्येकी ११७ लागतात. मात्र प्रशासनाकडे चालक ११९ असून, वाहक मात्र १०२ आहेत. त्यामुळे १५ वाहकांची कमतरता भासते. सलग आठ तास चालक, वाहकांना ड्युटी करावी लागते. वाहक कमी असल्याने सकाळच्या सत्रात काम करणाऱ्यांना सायंकाळी डबलड्युटी करावी लागते. परंतु आरोपपत्र मागे घ्या अन्यथा दुहेरी ड्युटी न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने ६३ फेऱ्या जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. (प्रतिनिधी)शालेय मार्गावरील फेऱ्या रद्द काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय फेऱ्या सुरू केल्या आहेत. दुहेरी ड्युटीमुळे दुपारी १२.१०ची शिर्के हायस्कूल -मजगाव, दुपारी ४.२०ची मिस्त्री हायस्कूल- सोमेश्वर, सायंकाळी १७.४० वाजता पटवर्धन हायस्कूल टेंभ्येपूल, सायंकाळी १७.५५ ची वेधशाळा-सडामिऱ्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसस्थानकात गर्दी केली होती. काही विद्यार्थी शेअर रिक्षाने घरी जाणे पसंत केले.बसस्थानकातच घासते बसरत्नागिरी शहरी बसस्थानकातून बाहेर पडताना पडलेला खड्डा व तेथून रस्त्यावर जाताना शेवटची पायरी व एसटी बसचा मागचा भाग घासला जातो. तीच परिस्थिती बसस्थानकात प्रवेश करताना आहे. त्यामुळे पायरी एका दिवसात घासून तुटणे शक्य नाही. दररोज घासून घासून ती सैल होऊन तुटली असल्याचे चालक, वाहकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. संबंधित खड्डे न बुजविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरातील बससेवा विस्कळीत
By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST